मुंबई । प्रतिनिधी
मुरबाड तालुक्यातील देहरी-गोरखगडावर ( Dehri Gorakhgad ) गेलेल्या तरुणीचा मोबाईलमध्ये सेल्फी काढताना तोल जाऊन दरीत पडल्याची घटना समोर आली आहे. दामिनी दिनकरराव (१७) असे तोल जाऊन दरीत पडलेल्या तरुणीचे नाव आहे.
शहापूर तालुक्यातील (Shahapur Taluka) उंभ्रई गावात दामिनी राहते. ती काही मित्रांसोबत मुरबाड तालुक्यातील गोरखगडावर दुपारच्या सुमारास गेली होती. त्यावेळी गडावरील एका ठिकाणी ती मोबाईलमध्ये सेल्फी काढत होती. त्याचवेळी दरीच्या कडेला उभी असताना मोबाईलमध्ये सेल्फी काढताना तिचा तोल जाऊन ती गडावरून दरीत पडली.
या घटनेनंतर दामिनीच्या मैत्रिणींनी मुरबाड पोलिसांना (Murbad Police) ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मुरबाड पोलिस आणि सह्यागिरी ट्रेकर संस्थेच्या व गावकऱ्यांच्या मदतीने दरीत शोध मोहीम सुरु केली. मात्र, सायंकाळच्या सुमारास अंधार पडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आले होते. तब्बल पाच तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर मृतदेहास नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येऊन शवविच्छेदनानंतर मृतदेहावर अंत्यसंसकार करण्यात आले.
उंचावर, टेकडीवर अथवा डोंगरावर जाऊन सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन मृत्यू झाल्याच्या घटना सातत्यानं वाढत आहेत. अनेकदा स्थानी वनविभाग, गावकरी यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात येते. मात्र पर्यटक याकडे सर्रास दुर्लक्ष करतांना दिसतात.