Video : ‘देव तारी त्याला कोण मारी’ तिसऱ्या मजल्यावरून तीन वर्षांचा मुलगा खाली पडला!

नाशिक । प्रतिनिधी
तिसऱ्या मजल्यावरून खाली पडलेला तीन वर्षाचा चिमुरडा सुखरूप वाचल्याची घटना गुरुवारी ओझरमध्ये उघडकीस आली. येथील चांदणी चौक भागातील अलसना अपार्टमेंट येथे ही घटना घडली.

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. ओझर येथील चांदनी चौकातील अलसना अपार्टमेंट मध्ये फेयजान सद्दाम शेख राहतात. दुपारी पावणे एकच्या सुमारास तीन वर्षांचा मुलगा घराच्या बाल्कनीत खेळत होता. यावेळी त्याची आई घरात काम करत होती. गॅलरीत खेळत असतांना थेट तिसऱ्या मजल्यावरुन खाली रस्त्यावर पडला होता. मात्र तो आश्चर्यकारकरित्या बचावल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

दरम्यान यावेळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत त्यास उचलले. त्यानंतर त्या मुलास तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. एवढ्या उंचीवरुन पडून देखील त्याला दुखापत झाली नसल्याने डॉक्टरांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले आहे.