नाशिक: नाल्याच्या पाण्यात तोल जाऊन पडल्याने बारा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिलापूर गावात (Shilapur village) घडली. त्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कृष्णा दीपक गांगुर्डे (Krishna Gangurde) असे मुलाचे नाव असून मुलगा अवघ्या १२ वर्षाचा होता. ही घटना औरंगाबाद रोडवरील शिलापूर या गावातील आहे.
हवामान खात्याने जिल्ह्याला अतिवृष्टीचे संकेत दिले आहे. त्यामुळे जिल्ह्याला रेड अलर्ट (Red alert to Nashik district) जारी करत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशात १२ वर्षीय कृष्णाच्या शाळेला देखील सुट्टी होती. तो घराजवळच खेळत होता. खेळता खेळता अचानक कृष्णचा तोल गेला व कृष्णा शेजारील नाल्यात पडला तिथेच कृष्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. घटना ज्या वेळेस घडली त्यावेळी घटनास्थळी कोणीही उपस्थित नव्हते. अशात कृष्णा नाल्यात पडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नसल्यामुळे त्याचा मृत्यु झाला. दरम्यान या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळद व्यक्त होत आहे. कृष्णाच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
३ ते ४ दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे नदी-नाले दुथड्या भरून वाहत आहे. गोदावरी नदी तसेच तिच्या उपनद्यांनीही भीषण रूप धारण केले आहे. पावसामुळे नाल्यांनीही रौद्र रूप धारण केलं आहे. पूरस्थिती निर्माण होऊन नाशिक जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून जाण्याच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नये अशा सुचना देखील केल्या जात आहे.