‘लग्न कर नाही, तर पळवून नेईन’ दोन तरुणांच्या धमक्यांना कंटाळून नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बीड शहरानजीक असलेले समनापूर येथे घडली आहे. दोघे तरुण ओळखीतलेच असून ते तरुणीला सारखा त्रास द्यायचे, कंटाळून तरुणीने टोकाचे पाऊल उचलले. घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून तरुणीच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुमित्रा राजू ईटकर (वय 22) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित्राची बहीण यांच्या फिर्यादीवरुन, सुमित्रा राहणार हिरापूर ता. गेवराई, हमु. बीड ही बीएस्सी नर्सिंगचे शिक्षण घेत होत होती. दरम्यान तीन वर्षापासून तिची किशोर साठे याच्याशी ओळख होती. या ओळखीतून तो तिच्याकडे सतत लग्नाची मागणी करत होता.’माझ्याशी लग्न कर अन्यथा तुला पळवून नेईन व जीवे मारून टाकीन, अशी धमकी किशोर देत होता.
हा त्रास काही कमी नव्हता तोच किशोरचा मित्र सम्यक पारवे यानेही सुमित्राला लग्न करण्याकरता तिच्यामागे तगादा लावला होता. त्यामुळे या दोघांच्या जाचास कंटाळून अखेर सुमित्राने समनापूर शिवारात जाऊन एका विहिरीत उडी घेतली.
याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात खबर पसरताच एकच खळबळ उडाली. तरुणीच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत सुमित्राची बहीण संगीता लष्करे यांनी घटनेत खुलासा करत बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात किशोर साठे व सम्यक पारवे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.