नाशिकच्या अजून एका माजी आमदाराने व्यक्त केली राष्ट्रवादीवर नाराजी

शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडखोरीनंतरही महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद थांबायला तयार नाहीये. नाशिकमधील शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज आहीरे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असो किंवा कोणत्याही निवडणूक असो त्या स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. योगेश घोलप हे बबनराव घोलप यांचे सुपुत्र असून खासदारांच्या बंडखोरीनंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ज्या बबन घोलपांना उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहे, त्याच बबन घोलपांचे पुत्र योगेश घोलप यांनी अशा प्रकारचे नाराजी व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्यामुळे शिवसेनेचे ४० आमदारांनी बंडखोरी केली. याचा मोठा फटका शिवसेनेला (Shivsena) बसला. मात्र अद्यापही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबत महाविकासआघाडी तोडल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केलेली नाही. अशात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबतच जाणार का? याबाबत प्रश्नचिन्ह असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असो किंवा कोणत्याही निवडणूक असो त्या स्वबळावर लढण्याची घोषणा योगेश घोलप यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेने बंडखोरीनंतरही महाविकास आघाडी मधील अंतर्गत वाद सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

बंडखोरीनंतर सावरण्यासाठी उद्धव ठाकरे पक्ष बांधणीकडे लक्ष केंद्रित करत आहेत. भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी ठेवायची का? याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाहीये. असं असलं तरी महाविकास आघाडीत असलेले अंतर्गत वाद आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज आहीरे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्याने पहायला मिळत आहेत. अशात आमदार योगेश घोलप यांनी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने मविआमध्ये असलेल्या अंतर्गत वादाच्या चर्चांना हवा मिळत आहे.