By चैतन्य गायकवाड |
गुवाहाटी : शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्या या बंडात अनेक आमदार देखील सोबत आहे. सध्या राज्यभर हाच मुद्दा चर्चेत आहे. या मुद्द्यासमोर इतर अनेक प्रश्न गौण ठरत आहे. हे बंडखोर आमदार आम्ही शिवसेनेतच आहोत, असे म्हणत आहे. तसेच आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत, असे देखील सांगत आहे. मात्र, सामान्य शिवसैनिक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या या बंडावर चांगलेच नाराज झालेले दिसत आहे. अनेक सामान्य आणि निष्ठावान शिवसैनिक या बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन करत आहे. या सामान्य कार्यकर्त्यांचे ‘मातोश्री’ सोबत एक वेगळेच ऋणानुबंध आहे. त्यामुळे आपला पक्ष असा फुटत असल्याचे पाहून, या शिवसैनिकांना गहिवरून येत आहे.
त्यातच आता कुणाच्याही ध्यानीमनी नसताना बाळासाहेब ठाकरेंवरील (Balasaheb Thackeray) श्रध्दा व शिवसेनेवरील नितांत प्रेमापोटी शिवसेनेचा एक निष्ठावान आणि कट्टर कार्यकर्ता थेट गुवाहाटीला पोहचला आहे. या कार्यकर्त्याने थेट मंत्री एकनाथ शिंदे यांना परत या, असे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे मातोश्रीला परत चला, अशी मागणी हा कार्यकर्ता एकनाथ शिंदे यांच्याकडे करत आहे. हे बंडखोर आमदार गुवाहाटी मधील ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत, त्या हॉटेलबाहेर हा कार्यकर्ता हातात फलक घेऊन उभा आहे. या आमदारांना परत चला, अशी आर्त हाक तो मारत आहे. आता या निष्ठावान शिवसैनिकाची हाक या आमदारांना ऐकू जाईल का, हा प्रश्न आहे. साताऱ्याचे उपजिल्हाप्रमुख व कट्टर शिवसैनिक संजय भोसले (Sanjay Bhosale) हे थेट आमदारांना परत येण्याचे आवाहन करण्यासाठी गुवाहाटीत पोहचले आहे. त्यांनी हाॅटेल रॅडिसन ब्ल्यू येथे जावून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना उध्दव ठाकरेंकडे परत येण्याचं आवाहन केलं आहे. संजय भोसले यांनी आपल्या हातात, “शिवसेना जिंदाबाद ! एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला, उद्धवजी आणि आदित्यजी यांना साथ द्या !” असा मजकूर लिहिलेला फलक हाती घेतला होता.
मात्र, हा शिवसैनिक हॉटेलबाहेर फलक घेऊन उभा असताना गुवाहाटी पोलिसांनी (Guwahati Police) त्यांना ताब्यात घेतले आहे. हॉटेल बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने पोलिसांनी संजय भोसले यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान, संजय भोसले हे बिजवडी (ता. माण) येथील असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी अतिशय तरुण वयात शिवसैनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर शाखाप्रमुख, विभागप्रमुख, माण तालुकाप्रमुख व आता सातारा उपजिल्हाप्रमुख म्हणून ते काम करत आहे.