मासिक पाळी प्रकरणाला नवे वळण; चौकशी अहवाल पीडितेला अमान्य !

नाशिकच्या देवगाव आश्रम शाळेतील (Devgav Aashram school) मासिक पाळी प्रकरणाला (Menstrual period matter) दर नव्या दिवशी नवं वळण येत आहे. काल पिडीत मुलीने बनाव केल्याचं चौकशी अहवालात समोर होतं. दरम्यान कालचा हा अहवाल अमान्य करत मासिक पाळी प्रकरणातील पीडित मुलगी राज्य बाल हक्क आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मासिक पाळीमुळे शिक्षकाने शाळेत वृक्षरोपण करू दिले नाही असा आरोप पीडित मुलीने केला होता. नाशिक जिल्ह्यातील देवगाव आदिवासी आश्रम शाळेत हा प्रकार घडला होता. दरम्यान या आरोपाची चौकशी केल्यानंतर आदीवासी विभागाने शिक्षकाला क्लिनचीट दिली आहे. ‘आरोप करणारी मुलगी त्या दिवशी शाळेत हजरच नव्हती’, असं रिपोर्टमध्ये नमूद केल्याने शिक्षकाला क्लिनचीट मिळाली. याच निर्णयाविरोधात पीडित मुलगी आणि काही सामाजिक संघटना आज राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहेत.

नाशिक मधील देवगाव आश्रम शाळेतील मासिक पाळी प्रकरण चांगलंच चर्चेत आलं. ‘मासिक पाळी असताना तू झाड लावलं तर ते जळेल म्हणून तू झाड लावू नको’, असं म्हणत शिक्षकांनी झाड न लावू दिल्याचा आरोप या मुलीने केला होता आणि पीडित मुलीने आदिवासी विभाग अधिकाऱ्याकडे याची तक्रार देखील केली होती. चौकशीनंतर मात्र असा आरोप करणारी मुलगी वृक्षारोपणाच्या दिवशी गैरहजर असल्याचं चौकशी अहवालात समोर आलं आणि या प्रकरणातील शिक्षकाला क्लीनचिट मिळाली. मात्र पीडित मुलीने हा अहवाल अमान्य केला आहे आणि पीडित मुलगी आता राज्य बाल हक्क आयोगाकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याची माहिती समोर येत आहे.