सध्या बिहारमधील (Bihar) एक घटना सर्वच माध्यमांमध्ये चर्चेत आहे. इथल्या शाळांची दुरावस्था तसेच शिकवण्याची पद्धत याबाबतीत काही वेळा देशभरात चर्चा सुरू असते. मात्र सध्या बिहारमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. ही घटना म्हणजे, बिहारमधील एका प्राध्यापकाने (Professor) चक्क आपला २३ लाख रुपये पगार परत केला आहे. एकाही विद्यार्थ्याला शिकवताना न आल्याने या प्राध्यापकांनी आपला पगार परत केल्याची माहिती मिळाली आहे. प्राध्यापकाच्या या कृतीने शिक्षण क्षेत्रात एक आगळे वेगळे उदाहरण समोर ठेवले आहे.
बिहारमधील एका महाविद्यालयातील हिंदीचे (Hindi) सहाय्यक प्राध्यापक डॉ. ललन कुमार (Pro. Dr. Lalan Kumar) यांनी वर्गात विद्यार्थ्यांच्या सतत शून्य उपस्थितीमुळे आपले वेतन परत केले आहे. या प्राध्यापकाने त्यांच्या दोन वर्षे नऊ महिन्यांच्या कार्यकाळासाठी वेतन म्हणून घेतलेले जवळपास २३ लाख ८२ हजार रुपये परत केले आहे. डॉ. ललन कुमार यांनी या रकमेचा धनादेश बिहार विद्यापीठाचे कुलसचिव यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या कुलसचिवांनी अगोदर हा चेक घेण्यास नकार दिला होता. मात्र या प्राध्यापकांनी नोकरी सोडण्याचे सांगितल्याने, त्यांच्या आग्रहापुढे आणि निर्णयापुढे विद्यापीठाच्या कुलसचिवांना हा धनादेश स्वीकारावा लागला.
डॉ. ललन कुमार यांच्या विषयी माहिती
डॉ. ललन कुमार हे मूळचे वैशाली जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण बिहार मधून पूर्ण केल्यानंतर, दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. डॉ. ललन कुमार यांची नियुक्ती २४ सप्टेंबर २०१९ मध्ये झाले. डॉ. ललन कुमार सांगतात, “माझी नियुक्ती झाल्यापासून कॉलेजमध्ये अभ्यासाचे वातावरण दिसलंच नाही. जवळपास ११०० विद्यार्थ्यांनी हिंदीत प्रवेश घेतला आहे. परंतु शून्य उपस्थितीमुळे ते त्यांची शैक्षणिक जबाबदारी पार पाडू शकले नाही. अशा परिस्थितीत पगार घेणे त्यांना अनैतिक वाटले.” कोरोना काळात सगळीकडेच ऑनलाईन शिक्षण पद्धती होती. या काळात देखील विद्यार्थ्यांची उपस्थिती नव्हती, असे ते म्हणाले. त्यामुळे एकाही विद्यार्थ्याला शिकवताना न आल्याने प्राध्यापक डॉ. ललन कुमार यांनी आपला पगार परत केला आहे.