नाशिक: निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) महाजनपूर (Mahajanpur) येथील सुपुत्र वीर जवान रंगनाथ पवार यांना राजस्थान (Rajasthan) येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असतांना वीर मरण आले आहे. ही वार्ता कळताच नाशिक जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. निफाड तालुक्यातील रंगनाथ पवार हे महाजनपूर राजस्थानमधील बाडमेर येथे कर्तव्यावर होते. कर्तव्य बजावत असतानाच त्यांना वीरमरण आले असून त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. देशाचे संरक्षण करणाऱ्या वीर जवानाला वीर मरण आल्यामुळे संपूर्ण निफाड तालुक्यात दुःखाचे वातावरण आहे. वीर जवान रंगनाथ पवार वीरगतीला प्राप्त झाल्यामुळे कुटुंबीयांसह अनेकांना अश्रू अनावर झाले.
महाजनपूर येथील रंगनाथ वामन पवार यांचे १२वी पर्यंत निफाड तालुक्यातच शिक्षण झालं. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने ते गुरे चारण्यासाठी जात असायचे. त्यातच १९९८ साली त्यांच्या मित्रांनी त्यांना मध्यप्रदेशातील भोपाळ (Bhopal, Madhyapradesh) येथे सैन्य दलात भरती होण्यासाठी नेले. तेथेच त्यांची निवड झाली. पुढे प्रशिक्षणासाठी त्यांना सहा महिन्यासाठी झारखंड (Zarkhand) मधील हजारीबाग येथे पाठविण्यात आले. त्यानंतर बीएसएफमध्ये (सीमा सुरक्षा बल) (Border Security Force) त्यांची नियुक्ती करण्यात झाली. अशी त्यांचा देशसेवेचा प्रवास सुरू झाला होता. सध्या ते राजस्थान मधील बाडमेर येथे सेवेत होते. आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेकांचा कंठ गहिवरला. तर या बातमीने पंचक्रोशीतील नागरिकांवर शोककळा पसरली आहे. ‘वीर जवान अमर रहे’ असे गौरवोद्गार काढत निफाडच्या या वीर सुपुत्राला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
महाजनपूर सारख्या छोट्याश्या खेड्यातून पुढे येत जवान रंगनाथ पवार यांनी अतिशय हलाकीच्या परिस्थितीशी झुंज दिली होती. त्यानंतर अतिशय कठोर परिश्रम घेऊन भारतीय सैन्यदलात दाखल होत, शत्रूंपासून देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर त्यांची झुंज सुरू होती. यातच त्यांच्या वीर गतीला प्राप्त होण्याची वार्ता समोर आली आणि भारतमातेने पुन्हा एक वीर सुपुत्र गमावला.