नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये आगळेवेगळे नियोजन करण्यात आले आहे. तसं तर अनेक राजकीय नेते मंडळींच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात. मात्र नाशिकमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी स्पर्धा भरविण्यात आली आहे. ही स्पर्धा ऑटो रिक्षा सजावटीची आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या म्हणजेच नऊ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. या साठी नाशिकमधील रिक्षाचालक सज्ज झाले आहेत. त्यानुसार नाशिक मधील हजारो रिक्षा चालक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यांनी स्पर्धेसाठी सहभाग देखील नोंदवला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र चर्चा नाशिकच्या या अनोख्या स्पर्धेची होत आहे.
नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी विविध कार्यक्रमासह स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात क्रिकेट चषक स्पर्धा तसेच रिक्षा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर भव्य रिक्षा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत रिक्षाची आकर्षक सजावट आणि रिक्षाचालकाचा उत्तम पेहराव यानुसार विजेता ठरणार आहे. शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
नाशिकमध्ये या स्पर्धेची जोरदार चर्चा सुरु असून रिक्षाचालक देखील या स्पर्धेसाठी उत्सुक आहे. स्पर्धेत विनामुल्य सहभाग नोंदवता येणार आहे. रिक्षाचालकांच्या रिक्षांचा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे बक्षीस ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार प्रथम क्रमांक विजेत्याला २१ हजार, द्वितीय क्रमांकाला ११ हजार, तृतीय क्रमांकाला ७ हजार, चौथ्या क्रमांकाला ५ हजार आणि पाचवे बक्षीस २ हजार रुपये असणार आहे. तसेच या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांना मोफत १ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि पॅनकार्ड या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. नाशिक शिंदे गटाकडून या स्पर्धेत सहभागी होऊन प्रचंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन रिक्षा चला आणि मालकांना करण्यात आले आहे.