नांदेड : लग्न म्हणले की भलेभले गुढग्याला बाशिंग बांधून तयारच असतात. सध्याच्या तरुणाईत लग्नाबद्दल एक वेगळीच क्रेज आहे. काहींनी लग्नासाठी खूप वाट पाहिलेली असते म्हणजे साहजिकच ते लग्नासाठी खूप उतावळे असणार, अशीच एक घटना नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यात घडली. नवरदेवाने चक्क पुराच्या पाण्यात थर्मकॉलवरून ७ किलोमीटर नदीतून प्रवास करत लग्नासाठी नवर्या मुलीच्या घरी गेला अशी अनोखी घटना घडली आहे. गेली अनेक दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे या पावसाने नांदेड जिल्ह्यालाही झोडपून काढले आहे. सततच्या या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा व कयाधू नदीला पूर आलेला आहे. यामुळे नवऱ्यामुलीच्या गावाला जाण्याचा मार्ग बंद झाला. अश्यातच नवरदेवाने शक्कल लढवत थेट थर्माकॉलवर बसून ७ किलोमीटर चा नदीमार्गे प्रवास केला.
उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली गावात या नवरदेवाचे लग्न होते. हदगावातील करोडीच्या शहाजी राकडे यांचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील चिंचोली येथील गायत्री गोंगाडे या तरुणीशी होता. पण जिल्ह्यात काही दिवसांपासून सतत मुसळधार चालू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीला आणि कयाधू नदीला मोठा पूर आलेला आहे. त्यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. पण नवरदेवही जिद्दी लग्न ठरलेल्या तारखेला आणि ठरलेल्या वेळेत करायचंचं असे ठरवले मग काय नवरदेव आपलं सगळ वऱ्हाड घेऊन थार्मकॉल वर निघाला लग्नाला, काल १४ जुलै रोजी हळदी समारंभासाठीही नवरदेवाने आपले नातेवाईक आणि सर्व वऱ्हाडी थर्मकॉल वर बसवूनच नेले होते. आणि आज लग्नाच्या कार्यक्रमाला पण नदीमार्गे ७ किमी चा प्रवास करत लग्नमंडपात नवरदेव व वऱ्हाडी हजर झाले. अश्या या अनोख्या लग्नाची आता सगळीकडे चर्चा रंगली आहे.