मुंबई | प्रतिनिधी
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मंत्री अनिल परब यांनी धक्कादायक पाऊल उचलले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून कारवाई होणार, असल्याची माहिती मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे. आजच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते यावेळी म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी ३१ मार्च पर्यंतची मुदत कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. दरम्यान, जे बडतर्फ झाले होते, ज्यांची सेवा समाप्ती झाली होती, आणि जे कर्मचारी कामावर रुजू झालेले नाही, त्यांच्यावर आता कारवाई ०१ एप्रिलपासून सुरु केली जाणार आहे.
विशेष म्हणजे एसटी महामंडळात ११ हजार कंत्राटी कामगारांची भरती केली जाणार आहे. तर माध्यमांशी बोलतांना परब म्हणाले की, आज संध्याकाळी माझ्याकडे आकडा येईल. जे हजर झालेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही! बडतर्फ, निलंबित होते, जे आज अर्ज घेऊन हजर झाले, त्यांच्यावरची कारवाई मागे घेतली जाईल. मात्र जे हजर झाले नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला.