By चैतन्य गायकवाड
शिवसेनेचे एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे (shivsena) जवळपास ३९ आणि तसेच काही अपक्ष आमदार त्यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे अल्पमतात आलेले महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर अतिशय नाट्यमयरित्या भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. तसेच एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई देखील रंगली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्यामुळे शिवसेनेचे राजकीय अस्तित्व आता धोक्यात आले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ तसेच ‘शिवसेना भवन’ येथे पक्षातील पदाधिकारी, महिला पदाधिकारी, जिल्हाप्रमुख तसेच कार्यकर्त्यांची बैठक देखील घेतली. तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे देखील सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी या बंडखोर आमदारांवर अधिक आक्रमकपणे टीका केल्याचे देखील दिसून आले. त्यातच आता आदित्य ठाकरे हे राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती हाती आली आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या या राज्याच्या दौराला ‘निष्ठा यात्रा’ (Nishtha Yatra) असे नाव दिले असून, आदित्य ठाकरे या यात्रेच्या माध्यमातून राज्यभर फिरणार आहे.
आदित्य ठाकरे हे आता आधीपेक्षा अधिक सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा हा दौरा शिवसेनेला ‘नवसंजीवनी’ देणारा ठरणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यात शिवसैनिकांची कितपत साथ मिळते आणि शिवसैनिक आदित्य ठाकरे यांना किती प्रमाणात पाठिंबा देणार, हे देखील बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.