मुंबई : विरोधक शिंदे-फडणवीस सरकारला नेहेमी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असून आता युवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांसमोर चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. “मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आज पुन्हा एकदा चॅलेंज देतो कारण मला इतरांकडून उत्तर अपेक्षित नाहीय. त्यामुळे मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना पुन्हा चॅलेंज देतो की, मीडियासमोर माझ्यासोबत वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा करायला या” असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले असून मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंचे आव्हान स्वीकारणार का? किंवा ते यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारला अनेक सवाल करत घेरण्याचा प्रयत्न केले आहे. आदित्य म्हणाले, “आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला कुणी शेंबडी पोरं म्हणतात, तुम्हाला एचएमव्ही पत्रकार म्हटले जाते. कुठेही माफी न मागता, कारभारव जसा चालतोय तसा न चालवता मजामस्ती चाललेली आहे. बीएमसीमध्ये टाईमपास टेंडर चाललं आहे.”
“सत्तेची एक वेगळी मस्ती दाखवली जातेय. कृषीमंत्री महिलांना शिवीगाळ करतात. कुणीही पश्चात्ताप व्यक्त करत नाही. माफी मागत नाही. मुख्यमंत्र्यांकडून कारवाई केली जात नाही, कान टोचले जात नाहीत.”
“त्यांचे टीईटी घोटाळा असेल, ओला दुष्काळावरील विधान असेल, अनेक गोष्टी आहेत, शेतकरी मित्रांना कुठेही मदत पोहोचलेली नाही. नुसत्या घोषणेवर घोषणा केल्या जात आहेत. शेतकऱ्यांसाठी खरी मदत अजून पोहोचलेली नाही.”
“कायदा-सुव्यस्थेच्या चिंधळ्या उडत आहेत दादर-माहिमध्ये आपण बसलोय. इथल्या स्थानिक गद्दारांनी तर पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार केला. त्यांच्यावर आर्म्स अॅक्टची केस दाखल झालेली आहे. पण कुठेही अटक वगैरे झालेली नाही.”
“हे सगळं होत असताना वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबद्दल मी काही दिवसांपूर्वी बोललो होतो. वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेल्याचं आता दु:ख नाही. पण जो प्रकल्प आपल्याकडे येत होता तो ऐनवेळेला दुसऱ्या राज्यात जातो, कमी विकसित एमआयडीसीत जातो तेव्हा त्याला सुरु व्हायला सहा-सात वर्ष लागतो.”
मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान
‘महाविकास आघाडीच्या काळातच राज्याबाहेर गेला असा आरोप झाला. यावर आम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज केला. ज्याला दीड महिन्यांनी उत्तर आले आहे. त्याचा पुरावाच मी आणला आहे, असे ते म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी अनिल अग्रवाल यांना लिहिलेले पत्र ही दाखवले.
पत्र आल्याचे मी सांगत होतो. पण ते माझ्या हातात नव्हते. खोके सरकारमध्ये बसलेल्या आमच्याच लोकांनी मला हे सांगितलं होते. उद्योगमंत्री, उपमुख्यमंत्री खोटे बोलतायत का? घटनाबाह्य मुख्यमंत्री तर यावर बोलतच नाहीत. माझे त्यांना खुले आव्हान आहे की, त्यांनी माध्यमांसमोर माझ्याशी यावर चर्चा करावी. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून मला यावर उत्तर हवे आहे.
.