राजापूरसह ‘या’ ४१ गावांना मिळणार हक्काचे पाणी

नाशिक । प्रतिनिधी
येवला मतदारसंघातील अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी १६२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर धुळगावसह १८ गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाही लवकरच मार्गी लावण्यात येणार असून याबाबत तातडीने तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मागणी नुसार पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज बैठक पार पडली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला प्रशाकीय मान्यता देऊन याबाबतचे आदेश मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द केले. धुळगावसह १८ गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, मुख्य अभियंता सुभाष भुजबळ,अधीक्षक अभियंता सुनंदा नरवडे, कार्यकारी अभियंता सुजित मोरे, आमदार नरेंद्र दराडे, येवला विधानसभा अध्यक्ष वंसत पवार, अडतीस गाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

येवला मतदारसंघातील अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी तसेच धुळगावसह १८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बैठक लावण्याची मागणी केली होती.

त्यानुसार आज बैठक पार पडली. या बैठकीत राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली आहे. धुळगावसह १८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.