By चैतन्य गायकवाड |
विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) कुणाला उभे करायचे, यावर अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांमध्ये विचार मंथन सुरु होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP chief) शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. ह्या बैठकीत आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर चर्चा झाली. ह्या बैठकीतच विरोधी गटाकडून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (Former Union Minister Yashwant Sinha) यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा केली आहे.
कोण आहेत यशवंत सिन्हा… यशवंत सिन्हा यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९३७ रोजी बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील अस्तवन या गावी झाला. त्यांनी राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. १९६० साली त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. त्यांनी २४ वर्ष आयएएस (IAS) म्हणून काम केले. या काळात ते वाणिज्य मंत्रालयाचे उपसचिव देखील होते. १९८४ मध्ये त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन जनता दलामध्ये प्रवेश केला. १९८६ साली ते पक्षाचे सरचिटणीस झाले. १९८८ मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. ११९३ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. १९९६ साली ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्री करण्यात आले. काही काळ ते परराष्ट्र मंत्री देखील होते. २००५ मध्ये ते पुन्हा राज्यसभेचे खासदार झाले. यशवंत सिन्हा यांनी तीन वेळा लोकसभा खासदार म्हणून काम केलं आहे. भाजपमध्ये दुर्लक्षित झाल्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी अधिकृतपणे भाजपला सोडले. पुढे त्यांनी राष्ट्रमंच संघटनेची स्थापना केली. यशवंत सिन्हा यांनी २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केले.
अशी आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया..
नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत- २९ जून
नामांकन अर्जांची छाननी- ३० जून
नामांकन परत घेण्याची तारीख- २ जुलै
मतदान- १८ जुलै
मतमोजणी- २१ जुलै
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. रामनाथ कोविंद हे २०१७ साली या पदावर विराजमान झाले होते. ते देशाचे १५ वे राष्ट्रपती आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नवनिर्वाचित राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतात. राष्ट्रपतीपदासाठी सर्वसामान्य नागरिकांना मतदानाचा अधिकार नसतो. यासाठी अप्रत्यक्षपणे मतदान होते. केवळ विधानसभा व लोकसभा-राज्यसभेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधीच या निवडणुकीत मतदान करू शकतात. त्यांच्या मतांचे मूल्य उमेदवाराला विजयी ठरविते.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये यशवंत सिन्हा यांनी अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्रीपद भूषविले होती. २४ वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर १९८४ मध्ये त्यांनी केंद्रीय सेवेचा राजीनामा दिला व सक्रिय राजकारणात प्रवेश केला. व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील जनता दलात सिन्हा महासचिव होते. चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात सिन्हा पहिल्यांदा केंद्रीय अर्थमंत्री बनले. त्यानंतर १९९६ मध्ये सिन्हा यांनी भाजपचे प्रवक्ता झाले. १९९८ मध्ये वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्री झाले. २०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यावर सिन्हा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यानंतर सिन्हा यांचा मोदीविरोध वाढत गेला व अखेर त्यांना भाजपला सोडचिठ्ठी द्यावी लागली. २०२१ मध्ये सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ते पक्षाचे उपाध्यक्ष होते