मुंबई । प्रतिनिधी
महाराष्ट्रात (Maharashtra) भोंग्याच्या मुद्यावरुन राजकारण तापले असताना उत्तरप्रदेशचे (Uttarpradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निर्देशांनुसार उत्तर प्रदेशातील अनेक धार्मिक स्थळांवरील भोंगे एकतर खाली करण्यात आले आहेत, नाहीतर त्यांचा आवाज कमी करण्यात आला आहे.
आत्तापर्यंत जवळपास ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अतिरिक्त निर्देशक सचिव (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, ‘राज्यामधील धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवणे तसेच त्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून याच अंतर्गत एकूण १० हजार ९२३ भोंगे हटवण्यात आले आहेत. तसेच ३५ हजार २२१ भोंग्यांच्या आवाजाला मर्यादा घालून देण्यात आली आहे’, असे प्रशांत कुमार म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यावेळी प्रत्येक धर्माला त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं प्रार्थना करण्याचा योगी, अधिकार आहे. त्यासाठी माईक, स्पीकर यांचा वापरही करण्यास हरकत नाही. मात्र कुणाचाही अडथळा करुन जी गोष्टी केली जाते, त्याला प्रार्थना म्हणता येऊ शकत नाही, असे योगी म्हणाले होते. तसेच नव्याने माईक लावण्यासाठी परवानगी देऊ नये, असे आदेशही उत्तर प्रदेश सरकारकडून जारी करण्यात आले होते.