शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यानंतर शिंदे गटात अनेक जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, नगरसेवक आणि कार्यकर्तेही सामील झाले. आहेत हे पाहता शिंदे गटात येणाऱ्यांची संख्या वाढतच आहे .आता शिवसेनेला पुन्हा एक मोठ धक्का बसला आहे.
शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. एकीकडे शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर दुसरी कडे आता शिवसेनेतील निष्ठावान समजले जाणारे नेते आपापल्या पदाचा राजीनामा देत आहेत. रामदास कदम हे 2014 ला युती सरकारमध्ये पर्यावरण मंत्री होते रामदास कदम हे सलग चारवेळा विधान सभेवर आणि एकदा विधान परिषदेवर निवडून आले आहेत. त्यांचा मुलगा देखील योगेश कदम हे शिवसेनेचे आमदार असून ते आता शिंदे गटात आहेत.
रामदास कदम यांनी शिवसेनाव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र देखील लिहिलं आहे त्यात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर यापदाला कुठलीही किंमत राहिली नाही असं रामदास कदम यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे रामदास कदम यांनी लिहिलेल्या पत्रातून कदम यांची नाराजी दिसून येत आहे. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही, उलट मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेकवेळा अपमानित करण्यात आलं, असा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे.
रामदास कदम याचं पत्र
रामदास कदम यांचा मुलगा आणि आमदार योगेश कदम हे शिंदे गटात सामाल झाले आहेत. मुलांना जिथे जायचं आहे तिथ जाऊ दे मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच असणार आहे, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. 25 जूनला शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीतही रामदास कदम अनुपस्थित होते. या अगोदर देखील रामदास कदम यांच्या शिवसेनेतील नाराजीच्या चर्चा रंगू लागल्या होत्या त्यानंतर आता रामदास कदम यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला आहे.