By चैतन्य गायकवाड |
नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) घोषणा केलेली लष्कर भरतीची नवी ‘अग्निपथ योजना’ (Agnipath Yojna) यावरून सध्या देशभरात गोंधळाचे वातावरण सुरु आहे. अनेक राज्यांमध्ये या योजनेविरुद्ध विरोध सुरु आहे. या योजनेच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलनदेखील सुरू केले आहे. तरुणांचा या योजनेला वाढता विरोध बघता, या योजनेबाबत आता केंद्रीय गृह मंत्रालयाने (Central Home Ministry) मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Central Armed Police Foeces) आणि आसाम रायफल्सच्या ( Assam Riffles) भरतीमध्ये अग्निवीरांना १० टक्के आरक्षण (10 % reservation) देण्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘अग्निवीर’ म्हणून सेवा पूर्ण केलेल्यांसाठी या दोन्ही दलांमध्ये कमाल वयोमर्यादेतही सवलत जाहीर केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निवीरांना कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर अग्निपथ योजनेंतर्गत भरती होणाऱ्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची शिथिलता असेल. केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाने (Central Ministry of Home Affairs) या निर्णयाबाबत आपल्या ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली आहे.
‘अग्निपथ’ योजनेविरोधात निदर्शने : दरम्यान, केंद्र सरकारने लष्कर भरतीबाबत जाहीर केलेल्या नवीन ‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशभरातील तरुण निदर्शने करताना दिसत आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), बिहार (Bihar), राजस्थान (Rajsthan), हरियाणा (Hariyana) या राज्यांमध्ये या आंदोलनाचा प्रभाव अधिक दिसत आहे. बिहारमध्ये तरुणांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलेले दिसत आहे. संतप्त तरुणांनी रेल्वे पेटवून दिल्याच्या घटना घडल्या आहे. या आंदोलक तरुणांनी आज ‘बिहार बंद’ची हाक दिली आहे. दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री (Central Railways Minister) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी आंदोलकांना रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांनी तरुणांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे ‘अग्निपथ योजना’… मिळालेल्या माहितीनुसार, ‘अग्निपथ’ ही योजना ४ वर्षांच्या सेवेच्या कालावधीसाठी असणार आहे. या योजनेतून भरती झालेल्या तरुणांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तर, उरलेल्या कालावधीत म्हणजे ३.५ वर्षे ते तरुण सैन्यात कर्तव्य बजावतील. तसेच नवीन ‘अग्निपथ’ योजनेत सुरुवातीला ३० हजार रुपये महिना पगार जवानांना मिळणार आहे. त्यानंतर पगार वाढून ४० हजार इतका होईल. मुख्य म्हणजे इतर कायमस्वरूपी सैनिकांप्रमाणे पुरस्कार, पदके आणि विमा संरक्षण देखील या योजनेत मिळणार आहे. सरकार या पगाराच्या ३० टक्के रक्कम ‘सेव्हिंग’ म्हणून ठेवेल आणि ती ‘सेवा निधी’ मध्ये जमा करेल. उर्वरित ७०% पगार खात्यात जमा केले जातील. या ४ वर्ष पूर्ण केलेल्या जवानांपैकी केवळ २५ टक्के जववानांनाच कायमस्वरूपी सैन्यात भरती केली जाईल. या जवानांची गुणवत्ता आणि वैद्यकीय तंदुरुस्तीच्या आधारावर २५ टक्के जवानांना पुढे भरती केले जाईल. या योजनेत जे ७५ टक्के जवान बाहेर होतील, त्यांना सेवा निधी दिला जाईल. हा सेवा निधी १० ते १२ लाख इतका असणार आहे.