गडचिरोली: एकट्या गडचिरोली जिल्हयात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपयांची मदत करावी आणि ज्या १२ लोकांनी जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारकडे केलीये.
अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा, भामरागड आणि अहेरी भागातील गावांची पाहणी आज अजित पवार यांनी केल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. गडचिरोलीमध्ये २५ हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. धान आणि पिकांवर शेतकऱ्यांचा संसार अवलंबून होता. त्यासाठी त्याला वर्षभर जगण्याकरीता संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे साधारण पाऊणलाख हेक्टरी ज्यांचं पीक उध्वस्त झालं त्यांना तातडीने सरकारने मदत दिली पाहिजे असं अजित पवार म्हणाले. ‘मोलमजुरी करणाऱ्या लोकांना काहीच मिळणार नसेल तर त्यांनी जगायचं कसं? याचा विचार सरकारने केलाच पाहिजे आणि भरीव अशी मदत मग ती केंद्रसरकारकडून आणा किंवा राज्याकडून द्या परंतु त्यांना मदत करा सांगितले आहे.
जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड या भागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी पंचनामे करायला सांगून दहा ते बारा दिवस झाले. तरी, सगळीकडील पंचनामे झालेले नाहीत. ज्या गावांना भेटी दिल्या त्या शेतकऱ्यांनी पंचनामे झाले नाहीत फक्त आधारकार्ड व अर्ज घेतला आहे. मात्र पंचनामे केल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत कशी देणार आहात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अजित पवार यांनी विचारणा केली.
१२ तालुक्यातील आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे जातील त्यानंतर ते विभागीय आयुक्त ( नागपूर ) तिथून मदत व पुनर्वसन विभाग मुंबईला आणि मग तिथे फायनल होऊन त्यानंतर शेतकऱ्यांना मदत होणार आहे. आज शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची तातडीची गरज आहे. तातडीने अधिवेशन घेण्याचीही गरज आहे. पावसाळी अधिवेशन व्हायला विलंब होतो आहे ही वस्तुस्थिती आहे. याकडे सगळा महाराष्ट्र बघतोय… कालपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व यामध्ये विलंब लावू नका असे सांगितले आहे. आम्ही दोघं बघतोय ना असे बोलले परंतु दोघांनी मुंबईतून बघणं आणि ३७ जिल्ह्यात मंत्री नेमून पालकमंत्री पद देणं, त्यांना तिथे बसून या यंत्रणांना कामाला लावायला लागणं यामध्ये खूप फरक पडतो असेही अजित पवार यांनी सुनावले आहे.