अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘पृथ्वीराज’ हा आगामी चित्रपट (movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण तत्पूर्वी करणी सेनेने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला होता. करणी सेनेने या चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित (release) होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अखेर आता या चित्रपटाचे नाव ‘सम्राट पृथ्वीराज’ असे करण्यात आले आहे. याबाबत यशराज (Yash Raj) स्टुडीओकडून (studio) एक प्रसिद्ध पत्रक काढून कळविण्यात आले आहे.
राजपूत करणी सेनेने ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या निर्मात्यांना (producer) कायदेशीर नोटीस पाठवून जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत करणी सेनेने चित्रपटाच्या शीर्षकामुळे राजपूत समाज भावना दुखावल्याचे सांगत चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी केली होती. त्यांनर ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे निर्माते आणि करणी सेना यांच्यात अनेक बैठका (meetings) झाल्या. अखेर २७ मे रोजी, ‘पृथ्वीराज’चे निर्माते यशराज फिल्मस् यांनी राजपूत समाजाच्या भावना आणि मागणी लक्षात घेऊन चित्रपटाचे नाव बदलून ‘सम्राट पृथ्वीराज’ असे केले आहे.
याबाबत यशराज फिल्मस् यांनी प्रसिद्ध (published) केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय सिनेमाच्या इतिहासात यशराज फिल्म्सने अनेक सर्वोत्तम सिनेमे दिलेले आहेत. सातत्यानं आम्ही रसिकांचं मनोरंजन करत आहोत आणि करत राहू. आमच्या सिनेमाच्या नावाच्या संदर्भात तुमची जी तक्रार होती, त्याची आम्ही दखल घेतली आहे. आम्ही शूर योद्धा पृथ्वीराज चौहान यांचा अपमान होणार नाही याची काळजी घेऊ. उलट आम्ही त्यांच्या कामगिरीचे आणि देशाच्या इतिहासात त्यांनी दिलेल्या योगदानाचा आदर करतो. यासंदर्भात आम्ही तुमच्या तक्रारींचं निवारण करत आहोत. आम्ही चित्रपटाचं नाव बदलून ते ‘सम्राट पृथ्वीराज’ असं करू. आम्ही श्री राजपूत करणी सेना आणि त्यांच्या सदस्यांचं आभार मानतो की, तुम्ही आमच्या चित्रपटा संबंधीच्या भावना समजून घेतल्या. असं यशराज फिल्म्सचे सी.ई.ओ. अक्षये विधानी यांनी करणी सेनेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘सम्राट पृथ्वीराज’ ३ जूनला प्रदर्शित होणार… ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित (release) होणार आहे. हिंदी (Hindi), तामिळ (Tamil), तेलुगु (Telugu) या भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने सम्राट पृथ्वीराज यांची भूमिका केली आहे. तर मिस वर्ल्ड (Miss World) मानुषी छिल्लरने (Manushi Chhillar) सम्राट पृथ्वीराज यांची पत्नी महाराणी संयोगिताची भूमिका केली आहे. या चित्रपटात संजय दत्त (Sanjay Datt), सोनू सूद (Sonu Sud), आशुतोष राणा (Ashutosh Rana) हे कलाकार सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मानुषी छिल्लर या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन (director) चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे.