अलर्ट..! गंगापूर धरणातून पुन्हा विसर्ग; नदीच्या पाणी पातळीत वाढ

नाशिक : जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू झाली आहे. या संततधार पावसामुळे धरण साठ्याच्या पाणी पातळीत वाढ ही सातत्याने सुरूच आहे. त्यामुळे आता गंगापूर आणि दारणा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पाणी पातळी अति असल्याने नदीकाठच्या रहिवाशी, व्यापारी विक्रेते यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


पावसाने मागील दोन तीन दिवसात जराशी हुलकावणी दिली होती. सर्वत्र उन्हाळ्यासारखे कडक ऊन ही पडले होते. सर्वाना वाटले होते की पावसाचा या महिन्याचा कोटा पूर्ण झाला की काय, आता पाऊस थेट पुढच्या महिन्यातच धडकणार आहे. मात्र, पुन्हा एकदा आता पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे. गंगापूर धरणात यंदा विक्रमी पातळी देखील गाठलेली आहे. यंदा खूप लवकरच गंगापूर धरणाचा पाणीसाठा सरासरी ६५ टक्क्यांच्यावर गेला आहे. जिल्ह्यातील इतर धरणेही निम्याच्यावर भरली गेली आहेत. आणि अश्यात पुन्हा एकदा आता पावसाची संततधार सुरूच झाली आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा गंगापूर धरणातून आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून ३४८६ क्यूसेकने तर दारणा धरणातून ७२४३ क्यूसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच गोदावरी नदीवरील होळकर ब्रिज येथून ७५१५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा मोठा पूर आलेला आहे. आपल्या नाशिक चे पारंपरिक पूर मोजक म्हणजेच दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे. नदी पुन्हा हळूहळू आपले रौद्ररूप धारण करत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या रहिवाशांना तसेच व्यापारी, विक्रेते यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.