नाशिकमध्ये भरले अखिल भारतीय मराठी मुस्लिम साहित्य संमेलन

नाशिक : मुस्लिम मराठी साहित्याच्या माध्यमातून मराठी संस्कृती आणि समाज जीवनावर चर्चा करण्यासाठी नववे अखिल भारतीय मराठी मुस्लिम साहित्य संमेलन नाशिकमध्ये भरले आहे. नाशिकमधील भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आज आणि उद्या असे दोन दिवस हे साहित्य संमेलन रंगणार आहे.

अखिल भारतीय मराठी मुस्लिम साहित्य संमेलनासाठी प्रा. फकरुद्दिन बेन्नुर नगरी सजली असून, साहित्यिकांची आणि रसिकांची मांदियाळी बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये यापूर्वी २००१ मध्ये मुस्लिम मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्यानंतर आता २२ वर्षांनी हा मान पुन्हा नाशिकला मिळाला आहे. ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम हे या संमेलनाचे अध्यक्ष असून, ज्येष्ठ पत्रकार आरफा खान शेरवानी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले.

या दोन दिवसांच्या संमेलनात विविध कार्यक्रम, तसेच परिसंवाद रंगणार असल्याची माहिती डॉ. फारुक शेख यांनी दिली. या परिसंवादात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तमराव कांबळे, डॉ. अजिज नदाफ, माजी कुलगुरू डॉ. एन. एस. पठाण, ज्येष्ठ विचारवंत हुसेन दलवाई, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रतिमा परदेशी उपस्थित राहणार आहे. या संमेलनात विविध ठराव देखील करण्यात येणार आहे.

या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मुस्लिम असणाऱ्या साहित्यकारांच्या वाणीतून येणारी मराठी खूप सुंदर वाटते. भाषेवरून त्याच्या जाती-धर्माचा अंदाज लावता येणार नाही. या साहित्य संमेलनमध्ये मुस्लिम धर्माचे लोक येतात आणि मराठी मध्ये साहित्य सादर करतात हेच या संमेलनाचे फलित आहे. ते साहित्यिक ऐकतात ते उर्दू बोलण्याऐवजी स्थानिक भाषा वापरतात. अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान स्थानिक भाषांना आदर देऊन भाषेचा भेदभाव न करता सर्व प्रकारचे साहित्य मांडण्यात येते. या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधून मोठे साहित्यिक एकत्र येत असल्याची देखील माहिती डॉक्टर फारूक शेख यांनी दिली आहे.

अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात मुस्लिम लेखक मराठीतून लेखन करत आहेत/. या लेखकांना आपल्या व्यथा वेदना आणि नातेसंबंधातून निर्माण होणारे भावनिक तणाव प्राधान्याने काव्यातून व्यक्त करावेसे वाटतात. त्यामुळे मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असून मुस्लिम मराठी लेखकाची साहित्य निर्मिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे देखील या संमेलनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.