नाशिककर! पेट्रोल पंप बंद संदर्भात महत्वाची बातमी

नाशिक । प्रतिनिधी

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नुकतेच गुढीपाडव्यापासून विना हेल्मेट पेट्रोल दिले, तर पंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची घोषणा केल्यानंतर संतापलेल्या पेट्रोल डीलर्स असोसिएशनने गुढीपाडव्याच्या दिवशी नाशिक आयुक्तालय हद्दीतील सर्व सरकारी व खाजगी कंपन्यांचे पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. भुजबळ यांनी नववर्षाच्या स्वागताला असा बंद करू नका, असे आवाहन केले. मात्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनने या निर्णयावर ठाम राहत आज रात्री बारा वाजेपासून उद्या शनिवार रात्री बारा वाजेपर्यंत पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील डिझेल, पेट्रोल, सीएनजी, ऑइल, एलपीजी याची विक्री बंद राहणार आहे. बंदच्या काळात कुणालाही डिझेल किंवा इंधन पुरवठा केला जाणार नाही. तसेच शहरात असलेले ऑईल कंपनीचे स्वतःचे आउटलेट तसेच पोलिसांच्या अखत्यारीतील दोन पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवांना इंधन पुरवतील.

दरम्यान पेट्रोल डीलर्स असोशिएशनने आवाहन केले आहे कि, आम्ही सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करू इच्छितो की आपण देखील या काळाच्या आधीच आपल्याला आवश्यक असणारे इंधन भरून घ्यावे, म्हणजे इंधन विक्री बंद काळात आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचणीला तोंड द्यावे लागणार नाही असे आवाहन असोसिएशनने केले आहे.

तोपर्यंत ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिमेत सहकार्य नाही

विना हेल्मेट चालकास पेट्रोल दिल्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पंप चालकांवर दाखल करण्याचा तसेच विना हेल्मेट दोनदा पेट्रोल देताना आढळल्यास त्या पंपाची एनओसी रद्द करण्याचा निर्णय अतिशय एकतर्फी व आमच्यावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गार्‍हाणे मांडले. त्यांनी पोलीस आयुक्त यांच्या सोबत बोलण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आमच्या संघटनेच्या बैठकीत सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला की जोपर्यंत १९ नोव्हेंबर २०१९ रोजी आम्ही पोलीस आयुक्तांकडे उच्च न्यायालयातील वकील यांद्वारे केलेल्या अर्जाची सुनावणी होऊन तिचा लेखी निर्णय येत नाही तोपर्यंत ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिमेला या महिन्यात कुठल्याही प्रकारचे सहकार्य करायचे नाही, असा निर्णय पेट्रोल डीलर्स असोसिएशनने घेतला आहे