अमरावती : अमरावती (Amaravati) येथे २१ जून रोजी व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची गळा कापून हत्या झाली होती. हे प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे भाजप नेत्यांनी ही घटना राजस्थान (Rajasthan) मध्ये घडलेल्या उदयपूरच्या (Udaipur) घटनेसारखीच असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, या हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) (National Investigative Agency) सोपवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएचे पथक अमरावतीमध्ये दाखल झाले आहे. एनआयएने या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. या हत्येमागे नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्याशी संबंधित वाद असावा, असा आरोप भाजपाने केला आहे.
उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांची हत्या झाली. त्यामुळे या हत्येमागे आता नुपूर शर्मा प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचा तपास देखील पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ही हत्या नुपूर शर्मा वादाशी संबंधित आहे का, याचा काटेकोरपणे तपास करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (Shivrai Kulkarni) यांनी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेपासून दूर असलेल्या सहावा आरोपी या संपूर्ण घटनेचा सूत्रधार असल्याची माहिती मिळत आहे. हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला असावा, असा अंदाज अमरावती पोलिसांचा आहे. दरम्यान एनआयएच्या चार ते पाच सदस्यांचा समावेश असलेल्या पथकाने या प्रकरणाबाबत चौकशी केली. नंतर घटनास्थळी पाहणी सुद्धा केली आहे.
दरम्यान भाजपा खासदार अनिल बोंडे (BJP MP Anil Bonde) यांनी अमित मेडिकलचे संचालक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि या प्रकरणातील सूत्रधाराला अटक करावी, अशी मागणी केली आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ काही संदेश समाज माध्यमांवर प्रसारित केले होते. त्यामुळे ही घटना उदयपूरप्रमाणे असल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.