अमरावती : अमरावती (Amaravati) येथे २१ जून रोजी व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची गळा कापून हत्या झाली होती. हे प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे भाजप नेत्यांनी ही घटना राजस्थान (Rajasthan) मध्ये घडलेल्या उदयपूरच्या (Udaipur) घटनेसारखीच असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, ही हत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना समर्थन दिल्यामुळेच झाली, असा खुलासा अमरावती पोलिसांनी केला आहे. उमेश कोल्हे यांच्या खूनामागे नूपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का, याबाबत सखोल चौकशी करण्यात आली. यानंतर प्राथमिक तपासातून हा खून नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाला असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केला आहे.
उमेश कोल्हे यांचे अमरावतीच्या तहसील कार्यालयाजवळ अमित व्हेटर्नरी नावाचे एक मेडिकल दुकान आहे. २१ जूनच्या रात्री ते मेडिकल दुकान बंद करून ते घरी निघाले होते. ५१ वर्षीय उमेश कोल्हे एका गाडीवर होते तर त्यांचा मुलगा संकेत आणि पत्नी वैष्णवी दुसऱ्या गाडीवर सोबत होते. तेव्हा रात्री ११ च्या सुमारास चार ते पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्लेखोरांनी उमेश यांचा चाकूने गळा कापला आणि पळून गेले. जखमी अवस्थेत खाली पडलेल्या उमेश यांना मुलगा संकेत यांनी तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांची हत्या झाली. त्यामुळे या हत्येमागे आता नुपूर शर्मा प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचा तपास देखील पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती मिळाली होती. ही हत्या नुपूर शर्मा वादाशी संबंधित आहे का, याचा काटेकोरपणे तपास करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (Shivrai Kulkarni) यांनी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेपासून दूर असलेल्या सहावा आरोपी या संपूर्ण घटनेचा सूत्रधार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान भाजपा खासदार अनिल बोंडे (BJP MP Anil Bonde) यांनी अमित मेडिकलचे संचालक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि या प्रकरणातील सूत्रधाराला अटक करावी, अशी मागणी केली होती.