नाशिक शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे .नवविवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविले आहे. तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका अठरा वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी आत्महत्या केली आहे सासरच्या त्रासाला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या पंचवटी परिसरातील गौरी भावसार चा तीन महिन्यांपूर्वीच भद्रकाली परिसरात राहणाऱ्या मयूर भावसार या मुलासोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र शनिवारी रात्री सासरी राहत असलेल्या घरी छताच्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे.या घटनेनंतर भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
गौरीच्या कुटुंबियांकडून तिला सासरच्या मंडळींकडून वारंवार त्रास दिला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे गौरीच्या कुटुंबीयांकडून सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.दरम्यान आत्महत्या केलेल्या गौरी भावसारचा मृतदेह तिच्या माहेरच्या लोकांनी आणून स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर आणून ठेवल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर भद्रकाली पोलिसांनी सासू आणि सासऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर या मृतदेहाचा अंत्यविधी करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत