शिर्डीत साईचरणी फुलं-प्रसाद वाहण्याच्या बंदीवर महत्त्वाचा निर्णय आला समोर!

शिर्डीच्या साई मंदिरात हार आणि फुले नेण्यावर जी बंदी घालण्यात आली होती ती बंदी महिनाभर जैसे थे असणार आहे. आज या बंदीबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत साई संस्थान, स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांची बैठक पार पडली. या निर्णयासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्यामुळे आता साईचरणी फुलं आणि हार वाहण्यासंदर्भाचा निर्णय या समितीतर्फे घेण्यात येणार आहे.

आजच्या या बैठकीदरम्यान शिर्डीतील साई मंदिरात (Sai Mandir Shirdi) हार, फुलं आणि प्रसादावरील बंदी उठणार का याकडं साई भक्तांचं लक्ष लागलं होतं. काल झालेल्या बैठकीतख फुलं, प्रसादावरील बंदी उठवण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नव्हता. अशात आजच्या बैठकीत ही बंदी महिनाभर कायम असून याबाबत समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी महिनाभराचा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे महिनाभर तरी भाविकांना साई चरणी फुलं आणि हार अर्पण करता येणार नाही.

दरम्यान शिर्डीतील साई मंदिरात (Sai Mandir Shirdi) फुल-प्रसादावरील बंदी उठवण्याच्या मागणीवरुन विक्रेते आक्रमक झाले होते. ही बंदी उठवावी अशी मागणी फुल विक्रेत्यांनी केली होती. फुल विक्रेत्यांच्या या मागणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी चर्चा केली. जनभावनेचा आदर झाला पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांची भावना असल्याचं राधाकृष्ण विखे यांनी सांगितले आहे.