..आणि ३० वर्षांपूर्वी भारतीय चित्रपट सृष्टीला एक सुपरस्टार मिळाला..

By चैतन्य गायकवाड |

कुणी त्याला किंग खान म्हणून ओळखतं, तर कुणी बादशहा म्हणून ! कुणी त्याला रोमान्स किंग म्हणून ओळखतं. तर कुणी गुणी अभिनेता म्हणून ! त्याची ओळख चाहत्यांमध्ये काहीही असली तरी तो निर्विवादपणे भारतीय चित्रपट सृष्टीचा सुपरस्टार (superstar) आहे ! चित्रपट सृष्टीत कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही तो बॉलीवूडवर अधिराज्य गाजवत आहे. त्याने सुरुवातीच्या काळात रोमांटिक चित्रपट केले. त्यातून तो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला, तर तरुणींच्या मनावर राज्य करणारा राजकुमार बनला ! पण त्याने त्याच्या कारकिर्दीत ॲक्शन चित्रपट देखील केले. तो फक्त रोमान्स किंग नव्हे तर अष्टपैलू असल्याचेही दाखवून दिले. त्याच्या अनेक चित्रपटांनी कमाईचे रेकॉर्ड केले. काही चित्रपट हिट ठरले. त्याच्या कौटुंबिक चित्रपटांनी रसिकांना एकत्र बांधले. चाहत्यांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केले. त्याच्या समकालीन स्पर्धेत अनेक ‘हिरो’ असतानाही त्याने त्याचे अढळपद टिकवून ठेवले. हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. तो आज बॉलिवूडचा किंग खान आहे, तो बादशहा आहे, तो रोमान्स किंग आहे आणि तो भारतीय चित्रपट सृष्टीचा सुपरस्टार आहे ! त्याने अनेक पुरस्कारही मिळवले, चाहत्यांच्या मनावर अधिराज्य ही गाजवले. चित्रपटगृहात त्याच्या ‘एन्ट्री’वर भरभरून प्रतिसाद देखील मिळाला. तो कालही सुपरस्टार होता, आजही सुपरस्टार आहे आणि उद्याही सुपरस्टार असेल !

त्याचे नाव शाहरुख खान ! त्याच्या आयुष्यात आज एक खूप मोठा दिवस आहे. आज शाहरुख खानला चित्रपट सृष्टीत ३० वर्ष पूर्ण झाली. रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचा पहिला चित्रपट ‘दिवाने’ आजच्याच दिवशी म्हणजे २५ जून १९९२ रोजी प्रदर्शित झाला होता. पहिल्याच सिनेमामधून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. शाहरुख खानच्या या पहिल्याच चित्रपटाला घवघवीत यश मिळाले. त्याच्या ‘दिवाना’ या चित्रपटाने चाहत्यांना ‘दिवाना’ केले. या चित्रपटात भलेही तो सहाय्यक भूमिकेत असेल, पण याच चित्रपटाने तो ‘नायक’ म्हणून समोर आला. आणि आज बघता बघता त्याच्या कारकिर्दीला ३० वर्ष पूर्ण झाली. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले. त्यातले काही चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

‘पठाण’ सिनेमाचा लूक रिलीज …

शाहरुख खान (Shahrukh Khan) गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सृष्टीपासून दूर आहे. त्याचा नवीन चित्रपट केव्हा येणार याविषयी चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. मात्र, शाहरुखने आजच्या खास दिवशी त्याच्या आगामी ‘पठाण'(Pathan) या सिनेमातील ‘लूक’ रिलीज केला आहे. खूप दिवसांपासून ‘पठाण’ची चर्चा सगळीकडेच सुरू होती. असं असलं ती सिनेमातील शाहरुख आणि त्याच्या सहकलाकारांचे लूक मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. पण अखेर २५ जून रोजी शाहरुख खानने बॉलीवूडमध्ये ३० वर्ष पूर्ण केली आहेत. या आनंदाच्या दिवशी शाहरुखने आपल्या ‘पठाण’ सिनेमाचा लूक रिलीज केला आहे. ‘पठाण’ या सिनेमात शाहरुख खान एक इंडियन एजंटची भूमिका साकारत आहे. या सिनेमातून त्याचा समोर आलेला पहिला लूक खूपच जबरदस्त आहे. अशा लूकमध्ये शाहरुख याअगोदर दिसला नसेल. हातात बंदूक घेऊन उभा असलेला शाहरुखचा खतरनाक लूक पाहून काही क्षण थोडं भयानक नक्कीच वाटेल.