पतीवरचा राग! पत्नीने हत्या करून मृतदेहाचीही केली दुर्दशा

मध्यप्रदेश येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने पतीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यात आणखी धक्कादायक म्हणजे पत्नीने हत्या केल्यानंतर पतीचे गुप्तांगही छाटले आहे. ही धक्कादायक घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उर्ती या गावातील आहे. या घटनेने परिसर हादरला असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बीरेंद्र गुर्जर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्ती या गावी एक मृतदेह आढळला होता. हा मृतदेह बिरेंद्र गुर्जर या व्यक्तीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, यावरून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर पत्नी कांचन हिने पतीची निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत बिरेंद्र गुर्जर याच्या छळाला कंटाळून त्याच्या चार पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या. त्यानंतर मृताने कांचन गुर्जर हिच्यासोबत पाचवं लग्न केले होते.

या प्रकरणी बीरेंद्र गुर्जर याची पत्नी कांचन हिने खून केल्याची कबुली दिली, ती म्हणाली, पतीला मोठ्या प्रमाणावर दारूचे व्यसन होते, यातून तो तिचा सतत छळ करत होता. रोजचीच शिवीगाळा आणि सततच्या मारहाणीला कंटाळून तिने पतीला संपवायचा ठरवले.

दरम्यान, 21 फेब्रुवारीच्या रात्री तिने पतीला जेवणातून 20 झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. यामुळे तो गाढ झोपेत गेला, यानंतर पत्नीने त्यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने पतीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. इतकंच नाही तर त्यानंतर महिलेने पतीचं गुप्तांगही कापलं. यानंतर पतीचा मृतदेह घरापासून काही दूर अंतरावर फेकून दिला. अशी माहिती आरोपी कांचन हिने दिली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.