संतप्त शिवसैनिकांकडून ‘या’ आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड..

By चैतन्य गायकवाड |

पुणे : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडात शिवसेनेचे अनेक आमदार सहभागी झाले आहे. या बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरातील शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहे. या संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून विरोध करण्यास सुरूवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील समर्थक आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला आहे. आमदार सावंत यांच्या पुण्यातील (Pune) कार्यालयाची संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. पुण्यातील कात्रज परिसरात सावंत यांचे हे कार्यालय आहे. या कार्यालयाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून लक्ष्य करण्यात आले. पुण्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून आज सकाळी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर साखर कारखानाचे कात्रज परिसरात कार्यालय आहे. त्याठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते हातात भगवे झेंडे घेऊन आणि घोषणाबाजी करत दाखल झाले. त्यांनी थेट कार्यालयाची तोडफोड करायला सुरुवात केली. या कार्यालयाच्या केबीनच्या काचा फोडल्या, खुर्च्या फेकल्या, कागदपत्रे अस्ताव्यस्त केली आणि घोषणाबाजी करत ते निघून गेले

बघा व्हिडिओ…

https://youtu.be/wE5Idfstqx4

सध्या मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत फुट पडल्याचे दिसून येत आहे. पण सामान्य शिवसैनिक आजही ठाकरे यांच्या सोबत असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी कार्यकर्ते या बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन करत आहे. तर काही ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचेही दिसून येत आहे. या बंडखोर आमदारांपैकी काही आमदारांच्या कार्यालयाची संतप्त कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. तसेच काही शहरांत मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (CM and party chief Uddhav Thackeray) यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याचेही दिसत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या वाढत आहे.. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या अनेक आमदारांचा पाठींबा मिळताना दिसत आहे. एक-एक आमदार गुवाहाटीकडे जात आहे. हे आमदार शिंदे गटात सामील झाल्याने आता शिवसेनेचे जवळपास ३८ आमदार शिंदे गटात असल्याची माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपसोबत सरकार स्थापन करा, अशी अट घालत शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड पुकारले आहे. या बंडाला दिवसागणिक बळ मिळताना दिसत आहे. कारण दिवसेंदिवस या गटातील आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे.