Crime : श्रद्धा हत्याकांडानंतर काळजाचा थरकाप उडवणारे अजून एक हत्याकांड समोर आले आहे. हत्याकांडाची ही दुसरी घटना आग्रा येथील आहे. एका विद्यार्थिनीचे मृतदेह यमुना एक्स्प्रेस येथील सर्विस रोडवर ट्रॉली बॅगमध्ये फेकून दिला होता. हत्येचा तपास केल्यानंतर जी धक्कादायक माहिती समोर आली ती अत्यंत खळबळजनक आहे. वडिलांनीच पोटच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
मृत मुलीचे नाव आयुषी यादव असे सांगण्यात येत आहे. ती बीसीएचे शिक्षण घेत होती. दरम्यान, ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. हे प्रकरण कळल्यानंतर पोलिसांनी मृत मुलीच्या घरी जाऊन चौकशी केली, तेव्हा या मृत मुलीचे वडिलही घरी नसल्याचं उघडकीस आलं. अखेर पोलिसांच्या तपासाअंती वडिलांनीच आपल्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली असल्याचं निष्पन्न झाले आहे.
१८ नोव्हेंबर रोजी एक बॅग पोलिसांना आढळून आली. या बॅगच्या आजूबाजूला रक्ताचे डाग दिसले होते. या बॅगमध्ये एका मुलीचा मृतदेह असल्याचं निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा मृतदेह आयुषीचा होता. मृतदेह हाती लागल्यानंतर पोलिसांनी आयुषीच्या घरचा पत्ता तासांच्या आत शोधून काढला. जेव्हा पोलीस आयुषीच्या घरी पोहोचले. तेव्हा तिथे तिचे वडील नितीश यादव घरी नव्हते. त्याच क्षणी पोलिसांना मुलीच्या वडिलांवर हत्येचा संशय आला. अखेर पोलिसांनी रविवारी मृत मुलीच्या वडिलांना शोधून काढलं आणि त्यांची चौकशी केली. यात वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली दिली.
राहत्या घरातच गोळ्या झाडून आयुषीची हत्या केल्याची कबुली तिच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाहीये. दरम्यान तिची हत्या १७ नोव्हेंबर ला करण्यात आली असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर रात्रीच्या अंधारात हत्येची कबुली दिलेले आरुषीचे वडिल तिचा मृतदेह बॅग मध्ये भरून घरातून निघाले असावे. यमुना एक्स्प्रेसवर फेकण्याच्या इराद्याने निघालेल्या नितीश यादव यांनी संधी न मिळाल्याने त्यांनी बॅग यमुना एक्स्प्रेस वे च्या किनाऱ्यावर फेकली असावी अशी देखील शंका आहे.
आता हे हत्याकांड नेमकं कोणत्या कारणावरुन घडलं? कुणी घडवून आणलं? यासारख्या अनेक प्रश्नांची उकल पोलिसांच्या तपासाअंती होईल. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तपासाअंती काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागून आहे.