Home » बोम्मईंच्या ‘आरे ला का रे उत्तर द्या’; अजित पवारांचे शिंदेंना आव्हान

बोम्मईंच्या ‘आरे ला का रे उत्तर द्या’; अजित पवारांचे शिंदेंना आव्हान

by नाशिक तक
0 comment

Maharashtra-Karnatak Boundry crisis : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून वातावरण तापले असताना चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा रद्द करण्यात आला. त्यामुळे अजित पवारांनी निशाणा साधत सरकारवर टीका केली आहे. ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन असतो याची तुम्हाला कल्पना नव्हती का असा प्रश्न त्यांनी केला आहे.

‘महापरिनिर्वाण ६ डिसेंबरला असतो हे अख्ख्या भारताला वर्षानुवर्ष माहिती आहे. मग ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन असतो याची तुम्हाला माहिती नव्हती का ? तारीख निवडली तेव्हाच सांगायला पाहिजे होत महापरिनिर्वाण असल्यामुळे ६ डिसेंबरला न जाता दुसऱ्या दिवशी जाऊ. आता कधी जाणार तशी पुढची तारीखही सांगावी. बोम्मई साहेब सांगताय इथे आम्ही येऊ देणार नाही. ज्या राज्यात हे निघाले आहे, त्या राज्याचे मुख्यमंत्रीच म्हणतात येऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या हातात सर्व अधिकार असतात. यांचं अपयश झाकण्यासाठी हे थातुरमातुर उत्तर दिले जात आहे. अशी टीका हा दौरा रद्द करण्याचे जे कारण सांगितले जात आहे त्यावर अजित पवारांनी केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोम्मई यांना त्याच भाषेत उत्तर द्याव असं आवाहन अजित पवारांनी केले आहे. ‘तक्रार काय करताय त्यांच्या आ रे ला का रे ने उत्तर द्या ना, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला जशास तसं उत्तर देण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले पाहिजे,’ असं चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्यानंतर अजित पवार म्हणाले आहे.

चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा हा दौरा नियोजित झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना पुन्हा एकदा इशारा दिला होता. ‘आमच्यासाठी दोन राज्यांतील सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे, तुमच्या आक्षेपांवर वाद सुप्रीम कोर्टात सुरु आहे. तेथे लढू. येथे येऊन राज्याची शांतता आणि सुव्यवस्था बिघडवू नका’ असा इशारा बोम्मई यांनी दिला होता. ‘आम्ही आधीच मुख्य सचिवांद्वारे पत्र पाठवले आहे. मंत्र्यांनी बेळगावात येण्यासाठी ही योग्य वेळ नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ शकतो. देशात कुणालाही कुठेही फिरण्याची मुभा आहे. मात्र सध्याची वेळ योग्य नाही. शांतता राखण्यासाठी आम्हाला काही निर्णय घ्यावे लागत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, तुमच्या मंत्र्यांना इथे पाठवू नका. आमच्या मते, सीमाप्रश्न आधीच संपला आहे. तरीही महाराष्ट्र सुप्रीम कोर्टात गेलाय. त्यामुळे ही लढाई आपण सुप्रीम कोर्टातच लढू. जेणेकरून दोन्ही राज्यांतील नागरिकांचे संबंध तितकेच सौहार्दाचे राहतील,’ बंगळुरूत बोलताना बसवराज बोम्मई यांनी असे आवाहन केले होते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!