करण गायकर यांची स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी नियुक्ती

नाशिक: छत्रपती युवराज संभाजीराजेंच्या (Chhatrapati Sambhajiraje) स्वराज्य संघटनेच्या (Swarajya Sanghatana) अधिकृत प्रवक्ते पदी करण पंढरीनाथ गायकर (Karan Gaikar) व डॉ. धनंजय राजाराम जाधव (Dhananjay Jadhav) यांची निवड करण्यात आली आहे. स्वराज्य संघटनेचे प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या, स्वराज्य संघटनेच्या अधिकृत प्रवक्ते पदी करण पंढरीनाथ गायकर व डॉ. धनंजय राजाराम जाधव यांची निवड करण्यात आली.

विस्थापितांना न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर शंभूराजे व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्शांवर चालत, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला संघटित करण्यासाठी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. या संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, शोषित अशा अनेक घटकांना न्याय देण्यासाठी सक्षम संघटन उभे करण्यात येणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघता, कुठल्याही राजकीय पक्षाला सामाजिक प्रश्नांची जाणीव राहिलेली नाही. राज्यात अनेक प्रश्न समोर असताना, सर्व लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्ष हे आपल्या मस्तीत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत या महाराष्ट्राची जी विचारधारा आहे, ती जपण्यासाठी वरील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी या स्वराज्य संघटनेची पुढील वाटचाल असणार आहे. यासाठी या स्वराज्य संघटनेसाठी युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी अधिकृत प्रवक्ते म्हणून करण गायकर व धनंजय जाधव यांची निवड केलेली आहे .

करण पंढरीनाथ गायकर व डॉ. धनंजय जाधव यांनी मराठा आरक्षण, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, शोषित घटक यांसाठी अनेक सामाजिक आंदोलने व न्यायालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. तसेच समाजातील वंचित व शोषित घटकांसाठी ते गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीचे समाजाच्या सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.


“युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलावर विश्वास टाकला. स्वराज्य संघटनेचे अधिकृत प्रवक्ते पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. ही जबाबदारी घेऊन येणाऱ्या काळात बारा बलुतेदार, अठरा पगड जातीच्या सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन, येणाऱ्या काळात स्वराज्य या संघटनेची महाराष्ट्रात बांधणी करण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करेन. छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी माझे येणाऱ्या काळात प्रयत्न असतील.” – करण गायकर