शिवसेना शब्दाला जागणारा देशातील एकमेव पक्ष: अरविंद सावंत

नाशिक: छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhdhav Thackeray) यांच्या संदर्भात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत, उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही असा गंभीर आरोप केला आहे. या आरोपावर प्रत्युत्तर देताना शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Savant) यांनी, शिवसेना (Shivsena) हा शब्दाला जागणारा देशातील एकमेव पक्ष आहे असे विधान केले आहे.

आज मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेऊन छत्रपती संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरेंनी राज्यसभा उमेदवारीबाबत आपल्याला दिलेला शब्द पाळला नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांवर प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत बोलत होते. नाशिक (Nashik) येथे पत्रकरांशी संवाद साधताना छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या आरोपांवर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

अरविंद सावंत पुढे म्हणाले की, आम्हा शिवसैनिकांवर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. आम्ही दिलेला शब्द पाळतो. शिवसेना हा शब्दाला जागणारा देशातील एकमेव पक्ष आहे. उद्धव ठाकरे जड अंत:करणाने शिवसैनिकाला डावलून संभाजी राजेंना जागा द्यायला तयार होते. पण त्यांनी शिवसेनेत यावं, अशी इच्छा होती. पण संभाजीराजे यांना कोणतेही बंधन नको होते. त्यांना अपक्ष उभे राहायचे होते. लोकसभेत आणि राज्यसभेत पक्षाच्या सदस्य संख्येला महत्व असते. त्यामुळे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार राज्यसभेत जायला हवा. त्यामुळे शिवसेनेने अधिकृत उमेदवार उभा केला.