नवीन वर्षाच्या सुरुवातीला नाशिककर गारठले..!

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच थंडीने नागरिकांना हुडहुडी भरून दिली आहे. त्यामुळे वर्षाचे स्वागतच जणू थंडीने केले आहे. सुरुवातीलाच भारतात थंडीची लाट पसरली आहे. दरम्यान पुढचे आणखी काही दिवस थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे थंडीने नागरिक अजून गारठणार अशी शक्यता आहे.

नवीन वर्षाच्या प्रारंभीच निफाडमध्ये तापमानाचा पारा ७.८ अंशांपर्यंत खाली घसरला असून, तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे निफाडवासीयांना हुडहुडी भरली आहे. नाशिकमध्येही गारठ्यात वाढ झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कॅलिफोर्निया म्हटल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात २४ तासात पाऱ्यात २.६ अंशांची घट झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या शीतलहरींमुळे तापमानात घसरण झाली आहे. तर नाशिक शहरात थंडीचा कडाका वाढला असून, पारा १० अंशांपर्यंत खाली आला आहे. वाढलेल्या थंडीचा फटका मात्र द्राक्ष बागायतदार आणि इतर काही शेती पिकांना बसत आहे.

देशभरासह थंडीचा तडाखा महाराष्ट्रातही प्रखरतेने जाणवत आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे थंड वारे नागरिकांना गोठवत आहे. मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढत आहे. त्यामुळे मुंबई कमी मुंबईत राहून माथेरान मध्ये राहतोय की काय असं वाटायला लागलं आहे.

सोमवारी मुंबईत १५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कुलाब्यामध्ये १८.५ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी मुंबईचं तापमान हे १५.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर माथेरानमध्येही १५ अंश तापमानाची नोंद झाली आहे.नाशिक शहरात थंडीचा कडाका वाढला असून, पारा १० अंशांपर्यंत खाली आला आहे. निफाडमध्ये तापमानाचा पारा ७.८ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. राज्यभरातील अनेक शहरांमध्ये ११ ते १२ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तर भारत थंडा थंडा कुल कुल

उत्तर पश्चिम भारतातील मोठ्या भागात थंडीची लाट पसरली आहे. येत्या तीन दिवसांत उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या वेगळ्या भागांमध्ये पुढील दोन दिवस थंडीची लाट पसरण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

वाढलेल्या या थंडीचा फटका शेती मालाला बसत आहे. त्यामुळे बळीराजा मात्र चिंतीत झाला आहे. दरम्यान येत्या २ दिवसांत थंडीचा कडाका अजून वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.