घरात घुसून महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न..

अंबड : गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात अनेक गुन्हेगारीच्या घटना घडतायेत. खून, चोरी, दरोडा, लुटमार अश्या घटना घडत असतानाच आता महिला देखील असुरक्षित असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अंबड (Ambad) येथे एका महिलेचा घरात घुसून जबरदस्तीने विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला आहे.

फिर्यादी महिलेने अंबड पोलिस ठाण्यात (Police Station) दिलेल्या तक्रारीनुसार, ही महिला अंबड भागातील खुटवडनगर परिसरात राहत असून संशयित आरोपी सतत सदर महिला घरात एकटी असताना जबरदस्तीने घरात घुसून शरीरसुखाची मागणी करत असे. तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत असे. तसेच संशयित आरोपी या महिलेस झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत असे. या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दि. २६ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) खतेले याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

दरम्यान सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महिलांना देखील असुरक्षित वाटत आहे. गेल्या आठवड्यात नाशिक शहरात खुनाच्या अनेक घटना घडल्या. या वाढत्या गुन्हेगारी घटनांवर पोलिसांनी अंकुश घालण्याची मागणी नागरिक करत आहे.