नाशिक: प्रेमाला काही वय नसते. प्रेम कधीही आणि कुणावरही होऊ शकते. या प्रेमाच्या रेशीम बंधात काहीजण यशस्वी होतात, तर काही अपयशी ठरतात. मात्र प्रेम भंगातून आलेला निराशेपोटी काहीजण टोकाचा निर्णय घेऊन आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतात. काही घटनांमध्ये तरुणांच्या अंगी असलेल्या वाईट व्यसनांमुळे आयुष्य संपण्याची वेळ येते. शहरात पुन्हा एकदा प्रेमभंग होण्यातून अशीच एक घटना घडली आहे. एका प्रेमवीराने प्रेमभंग व नैराश्यातून चक्क सरकारवाडा पोलीस ठाण्यातच (Sarkarvada Police Station) विषारी औषध (toxic drug) सेवन करीत आत्महत्येचा (suicide attempt) प्रयत्न केला. या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण बचावले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर युवक हा २८ वर्षाचा असून गवळी चाळ, गंगासागर कॉलनी, गंगापूर रोड येथे राहत आहे. या युवकाचा विवाह दोनदा ठरवूनही त्यास नकार मिळत होता. तसेच मद्याच्या व्यसनामुळे मुली त्याच्या सोबत लग्न करण्यास नकार देत असल्याचे, त्याच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले. या तरुणाचा विवाह नातेवाईकांच्या मध्यस्थीतून ठरला जातो. मात्र हा तरुण वधूच्या भेटीपूर्वीच मद्याच्या नशेत मुलीशी मोबाईलवर संपर्क करून बोलतो. याच कारणाला वैतागून दोन मुलींनी त्याला लग्नासाठी नकार दिल्याचे समोर आले आहे.
या तरुणाने सोमवारी (दि. ५) दुपारच्या सुमारास सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून मद्याच्या नशेत सरकारवाडा पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार यांच्या कक्षात उभे राहून, कुठलेही कारण नसताना विषारी औषध सेवन केले. या घटनेनंतर तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. हे उंदीर मारण्याचे विषारी औषध असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणास तातडीने जिल्हा रुग्णालयात (civil hospital) दाखल करण्यात आले असून, त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक खैरनार (API Khairnar) या घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहे.