आपल्या शेजारील राष्ट्र बांगलादेशाला आर्थिक संकटांनी भेडसावले असून या आर्थिक संकटातून बाहेर निघण्याच्या धडपडीत बांगलादेश सरकारने तेथील पेट्रोल आणि डिझेलच्या दारात प्रचंड वाढ केली. त्यामुळे तेथील लोक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले असून, रस्त्यावर तांडव करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बांगलादेश देखील श्रीलंकेच्या वाटेवर जातो की काय अशी भीती व्यक्त केली आहे.
रशिया आणि युक्रेनचे युद्ध तसेच कोरोना परिस्थिती या सर्वांमुळे कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत. यामुळे अनेक देशांचे कंबरडे मोडले असून जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. अश्यातच बांगलादेशाला आर्थिक संकटाने घेरले आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बांगलादेश सरकारने पेट्रोलच्या दारात ५१ टक्के तर डिझेल च्या दारात ४२ टक्के वाढ केली आहे.
सरकारच्या या निर्णयाविरोधात आणि वाढत्या महागाई विरोधात बांगलादेशी नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य केले असून बांगलादेशातील स्थिती श्रीलंकेसारखी झाली आहे. तेथील जनता ज्या पद्धतीने आकांडतांडव करत आहे त्यानुसार बांगलादेशातील स्थिती अधिकच बिघडत जाण्याची चिन्ह आहे. देशाची आर्थिक स्थिती बिघडल्याने इतर देशातुन येणारा तेल पुरवठा देखील बाधित झाला असून त्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या पॉवर प्लांटला टाळा लागला आहे. अनेक वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आलेली आहे. अर्थमंत्र्यांनी जागतिक नाणेनिधीकडे ४.५ अब्ज डॉलरचे कर्ज मागितले आहे.
बांगलादेशाने दुसऱ्या देशातून सामान मागवण्यात अधिक पैसा खर्च केला आहे. तसेच आपल्या देशातील निर्यात कमी केली आहे. त्यामुळे बांगलादेशाला घाटा झाला आहे. आयात निर्यातीबाबतचे नियोजन नसल्यामुळे बांगलादेशावर ही परिस्थिती ओढावल्याचे सांगितले जात आहे.