नाशिक: शहरात ११४९ धोकादायक इमारती आहे. त्यात ७५ इमारती ह्या अतिधोकादायक आहेत. अतिधोकादायक इमारतींना तत्काळ खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी दिली आहे. यंदा सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावसामुळे ज्या इमारती खूप जीर्ण झालेल्या आहेत त्या इमारतींना मोठा धोका असतो. त्या कधीही कोणत्याही क्षणी ढासळू शकतात, याने मोठया प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता असते. नाशिक शहरात अश्या ११४९ धोकादायक इमारती आहेत. या ११४९ मधून ७५ इमारती अतिशय धोकादायक यादीत आहेत. या ७५ पैकी २० इमारतींमधील पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अतिशय धोकादायक आढळल्या त्या इमारतींना महापालिका प्रशासनातर्फे अलर्ट जारी करण्यात आले आहे. तसेच त्या इमारतींतील नागरिकांना तत्काळ घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असेही आयुक्त पवार यांनी सांगितले.
यंदाचे पर्जन्यमान हे मगील वर्षाच्या तुलनेत जास्तच आहे. मागीलवर्षी या तारखेपर्यंत शहरात १९६ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र यावर्षी ५६४ मिमी म्हणजे जवळपास अडीच पट जास्त पावसाची नोंद झाली आहे. या जास्त पर्जन्यमानाचा जुन्या इमारतींना अधिक धोका असतो. आणि नाशिकमध्ये वाडे, घर कोसळण्याचा अनेक घटना नुकत्याच घडल्या आहेत. रविवारी कारंजा, जुने नाशिक येथील अनेक घर आणि वाडे आत्तापर्यंत कोसळली आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही, पण अश्या घटनांमध्ये जीवितहानीचा धोका असतो त्यामुळे ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून आता अति धोकादायक इमारतींना खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आणि इमारत खाली करण्याआधी एरिया स्टेटमेंट लिहून घेण्याचे आदेश देखिल पालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहे.