बीसीसीआय मालामाल.! आयपीएल ठरली जगातील दुसरी महागडी लीग..

By चैतन्य गायकवाड |

नवी दिल्ली : आयपीएलच्या (IPL) २०२३ ते २०२७ या पाच वर्षांच्या प्रसारण हक्कांची बीसीसीआयने (BCCI) विक्री केली आहे. त्यासाठी लिलाव करण्यात आला होता. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये हा लिलाव सुरु होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (secretary Jay Shah) यांनी ट्विटकरून याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे. २०२३ ते २०२७ या काळात आयपीएलचे टीव्ही प्रसारण हक्क स्टारकडे (Star) आणि डिजिटल राइट्स वायकॉमकडे (रिलायन्स) असणार आहेत. या लिलावातून बीसीसीआयला तब्बल ४८ हजार ३९० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. यामुळे एका सामन्याचा म्यूल्याचा विचार केल्यास आयपीएल ही जगातील दुसरी सर्वात महागडी लीग ठरली आहे. या प्रसारण हक्कांच्या लिलावासाठी बीसीसीआयने चार वेगवेगळे पॅकेज गुंतवणूकदारांसमोर ठेवले होते. एका सामन्याच्या म्यूल्याचा विचार करता नॅशनल फुटबॉल लीग (एनएफएल) ही जगातील पहिल्या क्रमांकाची महागडी लीग आहे.

बीसीसीआयचे चार विशेष पॅकेज… १) पॅकेज ‘ए’ : भारतीय उपखंडासाठी टिव्ही प्रसारणाचे अधिकार – हे पॅकेज ‘स्टार’ने खरेदी केले आहे. 23 हजार ५७५ कोटी रुपयांत स्टारने हे पॅकेज खरेदी केले आहे. २) पॅकेज ‘बी’ : भारतीय उपखंडासाठी डिजिटल प्रसारणाचे अधिकार – हे पॅकेज रिलायन्सच्या वायकॉम १८ या कंपनीने 20 हजार ५०० कोटी रुपयांत खरेदी केले. ३) पॅकेज ‘सी’ : प्रत्येक सत्रात १८ निवडक सामन्यांच्या डिजिटल प्रसारणाचे अधिकार – हे पॅकेज देखील वायकोम १८ या कंपनीनेचं खरेदी केले आहे. यासाठी या कंपनीने २ हजार ९९१ कोटी रुअपये मोजले आहे. ४) पॅकेज ‘डी’ : भारतीय उपखंडाबाहेरील देशांमध्ये टिव्ही आणि डिजिटल प्रसारणाचे अधिकार – बीसीसीआयचे हे चौथे पॅकेज वायकॉम १८ आणि टाईम्स इंटरनेटने १३२४ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे २०१८ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी आयपीएलच्या टिव्ही आणि डिजिटल हक्कांसाठी स्टारने १६ हजार ३४८ कोटी रुपये मोजले होते. यावेळच्या लिलावात स्टारने गेल्यावेळेपेक्षा जास्त किंमत मोजली आहे.

आयपीएल जगातील दुसरी महागडी लीग… आयपीएल सामन्यांच्या या प्रसारण हक्क विक्रीच्या लिलावातून बीसीसीआय मालामाल झाली आहे. या लिलावातून बीसीसीआयला तब्बल ४८ हजार कोटी रुपये मिळणार आहे. या लिलावातून एका सामन्याच्या म्यूल्याचा विचार करत आयपीएल जगातील दुसरी महागडी लीग ठरली आहे. प्रथम क्रमांकावर नॅशनल फुटबॉल लीग (एनएफएल) आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) आहे. चौथ्या क्रमांकावर मेजर लीग बास्केटबॉल आहे. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन आहे.