घंटागाडी कर्मचाऱ्याची आत्महत्या.. सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप..

By चैतन्य गायकवाड |

नाशिक : नाशिकमध्ये घंटागाडी कर्मचाऱ्याने सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. किरण पुराने (Kiran Purane) असे आत्महत्या केलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी किरण पुराने या कर्मचाऱ्याने काही घंटागाडी निरीक्षक आपल्याकडे ठराविक रकमेची मागणी करत असल्याचा संदेश व्हाट्सअपवर शेअर केला आहे. या जाचाला कंटाळून, मी हे कृत्य करतोय असे त्याने या संदेशात लिहिले आहे. या कर्मचाऱ्याने सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आज सकाळी ही आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. या आत्महत्येच्या घटनेनंतर मृत घंटागाडी कर्मचाऱ्याचे नातेवाईक आक्रमक झाले आहे. या नातेवाईकांनी मॅसेजमध्ये नामोल्लेख केलेल्या संशयित निरीक्षकांना अटक करण्याची मागणी केली. तसेच या संशयित निरीक्षकांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. नातेवाईकांच्या या आक्रमक पवित्र्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात (district government hospital) काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या घटनेबाबत पोलिस (police) काय कारवाई करतात, याकडे नातेवाईकांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, मृत किरण यांच्या भावाने आरोप केला की, सुपरवायझरच्या आर्थिक जाचाला कंटाळून किरण याने आत्महत्या केली आहे. त्याचा तीन सुपरवायझरने छळ केला. हे तिघेजण किरणकडून महिना पाच हजार असे बारा महिन्यांचे ६० हजार रुपयांची मागणी करत होते. यामुळे किरणने आत्महत्या केली. त्यामुळे या तिघांवर कारवाई करण्यात यावी.

या घटनेवर कर्मचारी प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत किरण याच्याकडून तीन सुपरवायझर सातत्याने पैशाची मागणी करत होते. तसेच त्याने पैशे दिले नाही तर, तर त्याला मानसिकरीत्या छळत होते. या कर्मचाऱ्याने या तिघा सुपरवायझरविरुद्ध ऑफिसमध्ये तक्रारदेखील दाखल केली होती. परंतु या तक्रारीची नोंद घेण्यात आली नाही. या घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर महापालिकेचे नियंत्रण नाही. सबंधित ठेकेदार घंटागाडी कर्मचाऱ्यांना छळत आहे. तरी महापालिका या गोष्टीवर नियंत्रण ठेवत नाही. तसेच या तिघा सुपरवायझरना अटक करण्याची मागणी घंटागाडी कर्मचारी प्रतिनिधीने केली. तसेच मृत किरण याच्या घरच्यांना भरपाई देण्याची देखील मागणी केली.