क्रिकेट विश्वावर ‘भारत का राज’, जिकडे-तिकडे टीम इंडिया नंबर वन..!

वर्षाच्या सुरुवातीपासूनच भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी ताबडतोड कामगिरी करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावी केले आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. हा सिलसिला अजून संपला नाहीये. खेळाडूंचे वैयक्तिक यश सोडले तर संघाने एकत्र मिळून देखील चांगली कामगिरी केली आहे.

सुरुवातीलाच भारतीय संघाने मजबूत असलेल्या विरोधी संघांना धूळ चारली.  भारतीय संघाने न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्याविरोधात खेळल्या गेलेल्या टी २० आणि वन-डे मालिका आपल्या खिशात टाकल्या. त्यामुळे आता टीम इंडिया टी २०, वन डे आणि कसोटी अश्या तिन्ही फॉर्मेटमध्ये आघाडी वर आहे. या तिन्ही फॉर्मेटमध्ये भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावले आहे.

आयसीसीने ही यादी जाहीर केली असून क्रमवारीनुसार भारतीय संघ आणि भारतीय खेळाडू देखील आघाडीवर आहेत. भारतात खेळल्या गेलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताने वन-डे मालिका खिशात घालत क्रमवारीच्या यादीत चौथ्या स्थानाहून पहिल्या स्थानावर झेप घेतली. या मालिकेत ३-० च्या फरकाने भारताने किवींना हरवले होते.

 बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात मोठ्या धावसंख्येने ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत भारतीय संघाने पहिल्या स्थानावर उडी घेतली आणि कसोटीचे देखील किंग असल्याचे स्पष्ट केले. नागपूर कसोटीत रोहित शर्मा याने झेंडे गाडले. त्याने धडाकेबाज शतकीय पारी खेळत टीम इंडियाचा तोल तर सावरलाच शिवाय स्वतः आठव्या स्थानावर झेप घेतली आहे.

‘ये है नंबर वन इंडिया’

कसोटीत नंबर वन, टी २० मध्ये नंबर वन, एकदिवसीय सामन्यात नंबर वन अशा नंबर वन टीम इंडियाच्या खेळाडूंची कमालच न्यारी आहे. कारण इकडे देखील लिस्ट मध्ये फलंदाजी असो की गोलंदाजी टीम इंडियाच्या खेळाडूंनी पहिले स्थान आपल्या नावावर केले आहे. टी २० चा अव्वल फलंदाज सूर्या अर्थात सुर्याकुमार यादव आहे तर वन-डे अव्वल गोलंदाजाची जागा मोहम्मद सिराजने घेतली आहे. एवढेच काय तर कसोटीतील नंबर १ अष्टपैलूची जागा देखील भारताकडे सर जाडेजा म्हणजेच रविंद्र जाडेजाच्या रूपाने आहे. पहिले तर दूरच भारतीय खेळाडूंनी अनेक ठिकाणी दुसरे स्थान पण सोडले नाहीये. जसे की कसोटीतील नंबर २ अष्टपैलू खेळाडू आर अश्विन आहे. कसोटीतील नंबर 2 गोलंदाज आर अश्विन, टी २० तील नंबर २ अष्टपैलू हार्दिक पांड्या असून भारतच आघाडीवर आहे. अर्थात ही क्रमवारी सामन्यानुसार बदलती राहील मात्र भारतीय खेळाडू आणि संघाच्या या कामगिरीचे कौतुक तर झालेच पाहिजे.