सप्तशृंगी देवी दर्शनासाठी मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय..!

नाशिक : साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवी गडावर दर्शनासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता मंदिरात दर्शनासाठी भाविकांना पैसे मोजावे लागणार आहे. सप्तशृंगी देवी गडावर व्ही आय पी दर्शन सुरू होणार आहे आणि आता मातेच्या व्ही आय पी दर्शनसाठी भाविकांना प्रती व्यक्ती १०० रुपये लागणार आहेत.

वणी गडावर १३ तारखेपासून या व्ही आय पी दर्शनास सुरुवात होणार असून सप्तशृंगी देवी ट्रस्ट समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आला आहे. देवीच्या दर्शनासाठी गडावर भाविकांची अफाट गर्दी होत असते त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गर्दी नियंत्रणात ठेवण्यात फायदा होणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

नाशिकमधील वणी येथील सप्तशृंगी मातेचे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नववर्ष असो, सणवार असो किंवा नवरात्र असो अशा अनेक खास दिवसांमध्ये या पवित्र स्थानावर लाखो भाविक गर्दी करतात. नव्या कामांची सुरुवात भक्त श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे श्री भगवतीच्या दर्शनाने करतात. त्यामुळे श्री क्षेत्र सप्तशृंगगड कायमच भाविक – भक्तांच्या गर्दीने गजबजलेले असते. ही गर्दी पाहता मंदिर देवस्थानच्या वतीने सशुल्क दर्शनाचा निर्णय घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आता १३ फेब्रुवारी पासून प्रती व्यक्ती १०० रुपयाचे पास घेवून व्हिआयपी दर्शन घेता येणार आहे. अशी माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

‘श्री. भगवती मातेच्या मंदिरात वर्षभरातील चैत्र व नवरात्र उत्सव पौर्णिमा त्याच बरोबर मंगळवार, शुक्रवार व रविवार इत्यादी दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते. सदर गर्दीचे नियोजन व नियंत्रण व्हावे यासाठी मंदिर अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने प्रति व्यक्ती रु. १००/- प्रमाणे श्री सप्तशृंगी मातेचे सशुल्क दर्शन सुविधा सोमवार, दि. १३/०२/२०२३ पासून कार्यान्वित केली आहे. ही सुविधा भाविकांसाठी संपूर्णतः ऐच्छिक असून भाविकांना सर्वसामान्य दर्शन व्यवस्था आहे तशी उपलब्ध असेल. ऐच्छिक सशुल्क व्ही आय पी दर्शन सुविधेचा लाभ घेणाऱ्या वय वर्ष १० वर्षाच्या आतील वयोगटातील भाविकांना सदरचा पास मात्र निशुल्क असेल. मात्र सदर सशुल्क व्ही आप पी दर्शन पास हे विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात, उपकार्यालयात सकाळी ९.०० ते ६.०० वाजे दरम्यान भाविकांना उपलब्ध होणार असून सशुल्क व्ही आय पी दर्शन पासच्या माध्यमातून भाविकांना जलद श्री भगवती दर्शन सुविधेची संधी उपलब्ध होणार आहे व त्याच बरोबर सप्तशृंग गडावरील स्थानिक ग्रामस्थांना आधार कार्ड तपासून मोफत दर्शन सुविधा देण्याचे योजिले आहे, अशी माहिती विश्वस्त संस्थे मार्फत देण्यात येत आहे.