बांगलादेशनं (Bangladesh) भारतीय कांद्याची आयात (Onion Import) थांबवल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे बांग्लादेशने भारताकडून तात्काळ कांदा आयात सुरू करण्यासाठी चर्चा करावी अशी विनंती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Minister Bharti Pawar) यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल (Union Commerce and Industry Minister Piyush Goyal) यांच्याकडे केली आहे. भारताच्या बांगलादेश बरोबर कांदा निर्यातीच्या विषयाबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेत लवकरात लवकर निर्यात सुरू करण्याबाबत विनंती केली आहे.
कांद्याच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. देशात नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा कांदे उत्पादनात ३०.०३ टक्के वाटा आहे. अशात यंदा मुबलक प्रमाणात कांद्याचे उत्पादनही झाले आहे. कांदा लागवडीचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतो. कांदा हे हुकमी आणि नगदी पिक असल्यामुळे शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कांदयाचे उत्पादन घेतात अशी वस्तुस्थिती डॉ. भारती पवार यांनी यावेळी मांडली.
भारत सरकारकडून कांद्याची निर्यात खुली केली आहे. परंतु बांगलादेशाने भारतातून कांद्याच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्याबद्दल बांगलादेश सरकारकडे योग्य स्तरावर हा विषय मांडावा जेणेकरून बांगलादेशात कांद्याचे निर्यात लवकर सुरू करता येईल आणि त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होईल. बांग्लादेशात बंद असलेली कांदा आयात सुरु झाल्यास कांदा उत्पादक शेतकरी व कांदा व्यापारी यांना दिलासा मिळेल असे डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यासोबतच या प्रकरणी मंत्री पियूष गोयल यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचे भारती पवार यांनी सांगितले आहे. अशात भारताची बांगलादेशमध्ये कांदा निर्यात सुरु झाल्यास कांद्याच्या दरात साधारण १५ दिवसांनी परिणाम दिसतील. एकुणच निर्यात सुरु झाली तर, बाजारपेठेत कांद्याला भाव मिळून त्याचा प्रत्यक्ष लाभ कांदा उत्पादकांना मिळू शकेल.