एकनाथ शिंदेनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडले या पाडलेल्या खिंडारातून अजूनही गळती ही सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक मधील माजी ३४ नगरसेवक आणि कोअर कमिटी पदाधिकारी आज मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. जिल्ह्यातील एक खासदार आणि दोन आमदार जरी शिंदे गटात गेले असले तरी आम्ही उध्दव ठाकरेंच्या सोबत आहोत असा विश्वास हे नगरसेवक आणि पदाधिकारी देणार आहेत.
जवळपास ३४ माजी नगरसेवक आणि कोअर कमिटी पदाधिकारी हे आज ११ वाजता मातोश्रीवर जाणार आहे. हे सर्व नगरसेवक २०१७ ते २०२२ या पंचवार्षिक काळामध्ये निवडून आलेले आहेत. यावेळी शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र देखील भरून घेतले जाणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यातील शिवसेनेचा खासदार हेमंत गोडसे आणि २ आमदार म्हणजेच दादा भुसे आणि सुहास कांदे शिंदे गटात सहभागी झाले आहे. त्यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख होती. तरीही त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र ठोकला. आणि शिंदे गटात उघडपणे सहभागी झाले पण आमदार खासदार गेले तरी आम्ही तळागाळातील शिवसैनिक म्हणजेच सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सेनेतच आहोत असा विश्वास आणि निष्ठा ह्या नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जाते. आगामी काळात महापालिका निवडणुका ही येत आहेत.
नाशिक शहरामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधून पदाधिकारी नगरसेवक व शिवसैनिक असे जवळपास 300 प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाणार आहे. नाशिक शहरातून 900 प्रतिज्ञापत्र अपेक्षित असून त्यापैकी 300 प्रतिज्ञापत्र पक्षाकडे प्राप्त झाल्याची माहिती महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.
यापूर्वी शिवसेनेमध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या हातात शिवबंधन बांधले जायचे. मात्र हे धागे कच्चे असल्याचे बंडखोरीमुळे लक्षात आल्यानंतर आता, प्रतिज्ञापत्राच्या कायदेशीर बंधनामध्ये नगरसेवकांना बांधले जाणार आहे. या प्रतिज्ञा पत्राद्वारे नगरसेवकांची निष्ठा शिवसेना व मातोश्रीवर असल्याचे लिहून घेतले जाणार आहे.