मोठी बातमी! नाशकात cng दरात पुन्हा भडका मध्यरात्रीपासून नवे दर लागू

Edited By: Pavan Yeole

नाशिक : आधीच वाढलेल्या महागाईने नागरिक त्रस्त असताना आता पुन्हा एकदा नाशिककरांना सीएनजी गॅस दरवाढीचा झटका बसणार आहे. पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडलेले असताना .आता त्या पाठोपाठच सीएनजीचे दरही हळूहळू गगनाला भिडत आहे. इंधनाच्या दरवाढीने बेजार झालेल्या वाहन चालकांना या दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. नाशिकमध्ये सीएनजी गॅसचे दर तब्बल चार रुपये प्रति किलो ने वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता प्रतिकिलो मागे ४ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत . 91.90 रुपयावरून सीएनजी गॅस 95.90 रुपयांवर जाऊन पोहचला आहे .मध्यरात्रीपासूनच सीएनजी गॅसचे हे नवीन दर लागू झाले आहेत.

एकीकडे पेट्रोल- डिझेलचे दर वाढत असल्याने नागरिकांनी सीएनजी असलेल्या वाहनांना पसंती दिल्यानंतर आता सीएनजीचे दरही पेट्रोल – डिझेल दराच्या आसपास पोहोचले आहेत. त्यामुळे आता वाहन चालकांना अधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरात सीएनजी पंप कमी असल्याने सीएनजी गॅस भरण्यासाठी पंपाबाहेर वाहनचालकांना लांबच लांब रांग लावावा लागत असल्याने ती एक डोके दुखी ठरत आहे तर दुसरीकडे नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. मागील गेल्या काही दिवसांपासून वाहनचालकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.


नाशिक मध्ये गेल्या मागील तीन ते चार महिन्यात तब्बल ३० ते ३५ रुपयांनी सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. गॅसच्या दरात सतत वाढ होत असल्याने वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त केली सीएनजी ,पीएनजी ,एलपीजी ,अशा सर्व प्रकारच्या इंधनांमध्ये वाढ होत असल्याने आता महागाईचा भडका उडाला आहे. तर सततच्या वाढत्या महागाईतून नागरिकांना दिलासा मिळत नसल्याचे दिसत आहे. परिणामी इंधनाच्या दरात वाढ झाल्याने सर्वच जीवनावश्यक वस्तूच्या दरात हि वाढ झाल्याचे जाणवत असते. आता झालेल्या सीएनजीच्या दरवाढीनेही प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे भाडेही वाढण्याची शक्यात आहे .


सीएनजी गॅसच्या वापरात वाढ झाल्याने पेट्रोल डिझेलच्या वापरतही बचत होत असल्याचं म्हटलं जात आहे त्याचप्रमाणे नागरिकांचा कल देखील सीएनजी वाहनांकडे वळत आहे असे असताना आता पेट्रोल -डिझेलच्या पाठोपाठ सीएनजीच्या दरवाढीने देखील महागाईचा भडका उडाला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पेट्रोल – डिझेलचे दर कमी होऊन सध्या स्थितीला शहरात दर स्थिर आहेत तर गॅसच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.