मोठी बातमी…! महाराष्ट्रात हिजाबवरून पुन्हा वाद

देशात आता कुठे हिजाब चा वाद शमला होता, पण आता हिजाबचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. वाशीम येथे नीट परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ झाला आहे. वाशीम येथील शांताबाई गोटे विद्यालयात नीट परीक्षेदरम्यान पुन्हा एकदा हिजाब वरून वाद झाल्याचे समोर आलं आहे. परीक्षेला बसताना हिजाब आणि बुरखा काढण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप परीक्षार्थींच्या पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


शांताबाई गोटे विद्यालयात ही नीट परीक्षा घेण्यात आली होती. हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. पण वाशिम येथील या केंद्रावरील घडलेल्या प्रकाराबद्दल विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. घटना अशी की, मुस्लिम विद्यार्थिनींना नकाब आणि हिजाब काढण्यास सांगितलं असे कुटुंबीयांनी तक्रार केली आहे. या प्रकरणावर विद्यार्थिनींचे पालक संतप्त झाले आहेत.


पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे लिहिले आहे की, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात नीट चा पेपर घेण्यात आला होता, अनेक विद्यार्थ्यांसह दोन मुस्लिम विद्यार्थिनीही परीक्षेसाठी गेल्या होत्या, पण त्यांच्यासोबत परीक्षा केंद्रातील प्रशासकीय अधिकारी आणि सदस्यांनी गैरवर्तन केलं. परीक्षेवेळी त्यांनी विद्यार्थीनींना म्हटलं की, ‘बुरखा काढा, काढला नाहीस तर कात्रीने कापतो.’
पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, आधी परीक्षा कक्षात येण्यास रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला, नंतर हिजाब आणि बुरखा काढून टाका असे सांगून बाहेर पाठवण्यात आलं, बराच वादा झाल्यानंतर शेवटी रस्त्यावर बुरखा आणि हिजाब काढण्यात आला. परीक्षा केंद्रात शिक्षकाचं असं वर्तन योग्य नसल्याचेही पीडित विद्यार्थिनीनं म्हटलं आहे.

काय आहे नक्की हिजाब प्रकरण?

२७ डिसेंबर २०२१ रोजी कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाबवरून वाद सुरू झाला होता. हिजाब घालून आलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. कर्नाटक राज्य सरकारनं जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता, त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभं करण्यात आलं. त्यामुळं मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शनं केली. या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळं हा विषय अधिकच चिघळला होता.

हिजाबच्या बंदीविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होता. या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे. हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याचं सांगत कर्नाटक उच्च न्यायालयानं यासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्या आहेत. पण तरीही वाशीम मध्ये जो प्रकार घडला आहे त्यामुळे हिजाब वादाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता दिसते आहे. पालकांनी याप्रकरण विरोधात गैरवर्तनाची तक्रार दाखल केली आहे.