मोठी बातमी! शुभांगी पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार; ठाकरेंकडून मुंबईहून रसद..

नाशिक : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शुभांगी पाटील यांच्यामागे ठाकरे गट पूर्ण ताकदीनिशी उतरला असून ठाकरेंनी मुंबईहून रसद पुरवली आहे. पदवीधर निवडणुकीत शुभांगी पाटील ह्या मविआच्या अधिकृत उमेदवार असल्या तरी त्यांच्या मागे काँग्रेस-राष्ट्रवादी किती ताकद लावेल याचा अंदाज आलेला आहे. त्यात आता ठाकरे गटाने त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला असून मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस यांना मुंबईहून पाठवण्यात आले आहे. तसेच मुंबईहून आणखीही नेते, नगरसेवक नाशिकला येणार असून उद्धव ठकरेंकडून शुभांगी पाटलांसाठी ही रसद धाडण्यात आली आहे.

नाशिक पदवीधर अतिशय चुरशीची असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे की कोण यात बाजी मारणार. या निवडणुकीचे निकाल आधीच जाहीर होते, सत्यजित तांबे निवडणून येणार, मात्र शुभांगी पाटील यांनी मविआचा पाठिंबा मिळवत निवडणूक अटीतटीची बनवली. शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यात सरळ लढत होणार असून हा सामना अतिशय चुरशीचा असणार आहे.

त्यात शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी ठाकरे गटाने आपली ताकद लावायला सुरुवात केली असून एक विशेष रणनीती आखण्यात आली आहे. त्यासाठी आ. विलास पोतनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शालिमार कार्यालयात बैठकी घेण्यात आल्या आहेत.

शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या विविध टीम आणि कार्यकर्ते मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात रवाना झाले आहेत. मुंबई तसेच अन्य भागातील कार्यकर्तेही मतदारसंघात दाखल झाले आहेत. आणखी रसद मुंबईहून रवाना होण्याची देखील माहिती आहे. शुभांगी पाटील यांना निवडणून आणायचेच हे ध्येय बाळगून ठाकरे गट नेते, कार्यकर्ते कामाला लागले असून समोरील उमेदवार सत्यजित तांबे यांना कांटे की टक्कर असणार आहे.