मोठी बातमी..! शिंदे आणि ठाकरे गटात तुफान राडा

बुलढाण्यात कृषी उत्पन्न बाजार समिती येथे (APMC) शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तुफान राडा झाला आहे. एपीएमसीमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि या ठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ सुरू होता. यात ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण बेर्ले यांनाही मारहाण करण्यात आली. तर जिल्हाप्रमुख संजय आढे यांच्या पोटात लाथ मारण्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तगडा पोलीस बंदोबस्त असताना देखील हा हल्ला झाला आहे. हल्ला करणाऱ्यांमध्ये आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाला गायकवाड तसेच त्याचे सहकारी आघाडीवर होते. असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. जवळपास पंधरा मिनिट हा सर्व प्रकार सुरू होता. मात्र पोलीस बघ्याची भूमिका घेतली होती असा देखील आरोप ठाकरे गटात कडून करण्यात आला आहे. त्यानंतर घटना नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मात्र, हे सगळं इथेच थांबलं नाही. तर, या बंडानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. इकडे आमदार आणि खासदार एकमेकांवर टीका करत असतानाच कार्यकर्त्यांमध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. बुलडाण्यात याचाच प्रत्यय आला आहे. या दोन्ही गटात तुफान मारामारी झाल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर बुलडाण्यातील आमदार, पदाधिकारी यांनी शिंदे गटाला समर्थन दिलं होतं. यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून बुलडाण्यात नव्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. या नव्या नियुक्त्यांनंतर सत्कार सोहळा ठेवण्यात आला होता. मात्र या नियुक्त्यांना आव्हान देण्यासाठी हा राडा करण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे.

कार्यकर्त्यांमध्ये देखील पडसाद

“50 खोके एकदम ओके’ या घोषणाबाजी वरून झालेला विधानभवनासमोरचा राडा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली होती. तर या दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की देखील झाली होती त्यानंतर आता बुलढाण्यात कार्यकर्ते भिडले. पावसाळी अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षातील नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून जोरदार आंदोलन करत होते.’50 खोके, एकदम ओक्के’ यासारख्या घोषणा देऊन महाविकास आघाडीनं विधानसभा परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीदेखील याच ठिकाणी आंदोलन केलं. त्यांनी करोना काळात झालेल्या भ्रष्टाचारावरून महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. तर यावेळी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले आणि एकच राडा झाला. यावेळी प्रचंड गोधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर आता बुलढाण्यात हे दोन्ही गट आमने सामने आले असून दोन्ही गटांमध्ये तूफान हाणामारी झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे या दोन्ही गटातील वाद आता मुद्द्यांवरून गुद्यांवर पोहोचल्याचं दिसत आहे.